
बांगलादेश संघाचे आव्हान संपुष्टात, रचिन रवींद्रचे दमदार शतक
रावळपिंडी : रचिन रवींद्र (११२) याच्या शानदार शतकाच्या बळावर न्यूझीलंड संघाने बांगलादेश संघाचा ४६.१ षटकात पाच विकेट राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड संघाने सलग दोन विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना स्पर्धेतील निकालावर कोणताही प्रभाव टाकू शकणार नाही. बांगलादेश संघाच्या पराभवासह पाकिस्तान संघाची उपांत्य फेरी गाठण्याची आशा देखील संपुष्टात आली.
न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी २३७ धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. विल यंग (०), केन विल्यमसन (५) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. तेव्हा न्यूझीलंड संघाची स्थिती दोन बाद १५ अशी बिकट झाली होती. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करुन डाव सावरला.
कॉनवे ४५ चेंडूत ३० धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याने सहा चौकार मारले. रचिन रवींद्र आणि टॉम लॅथम या जोडीने चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करत संघाचा विजय सुकर बनवला. रचिन रवींद्र याने आयसीसी स्पर्धेतील चौथे शतक ठोकले. अशी कामगिरी करणारा रचिन रवींद्र हा आता पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी केन विल्यमसन (३) व नॅथन अॅस्टल (३) यांनी प्रत्येकी तीन शतकं झळकावली आहेत. शतकानंतर रचिन रवींद्र ११२ धावांवर बाद झाला. त्याने १०५ चेंडूंचा सामना करत १२ चौकार व १ षटकार मारला. त्याच्या शतकाने न्यूझीलंड संघाचा विजय खूप सोपा झाला. तो बाद झाला तेव्हा न्यूझीलंडला विजयासाठी ३५ धावांची गरज होती. दुखापत झाल्यानंतर रवींद्र हा पहिलाच सामना खेळत होता. त्याने बहारदार शतक ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन महत्त्वाच्या स्पर्धेत पदार्पण सामन्यात शतक ठोकून रवींद्र याने एक नवा विक्रम रचला आहे.
टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स ही जोडी संघाला विजय मिळवून देईल अशी अपेक्षा होती. परंतु, लॅथम चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ५५ धावांवर धावबाद झाला. त्याने तीन चौकार मारले. ग्लेन फिलिप्स (नाबाद २१) आणि मायकेल ब्रेसवेल (नाबाद ११) यांनी ४६.१ षटकात संघाला पाच विकेट राखून विजय मिळवून दिला. तस्किन अहमद (१-२८), नाहिद राणा (१-४३), मुस्तफिजुर रहमान (१-४२) व रिशाद हुसेन (१-५८) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बांगलादेश संघ सर्वबाद २३६
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला गेला. परंतु, या सामन्याकडे पाकिस्तान चाहत्यांचे मोठे लक्ष लागले होते. या सामन्याच्या निकालावर यजमान पाकिस्तानचे स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे. तथापि, बांगलादेश संघ पाकिस्तानच्या अपेक्षेनुसार खेळू शकला नाही. बांगलादेश प्रथम फलंदाजी करायला आला आणि ५० षटकांत फक्त २३६ धावाच करू शकला. बांगलादेशकडून कर्णधार नझमुल हुसेन शांतोने सर्वाधिक ७७ धावा केल्या, तर झाकीर अलीने ४५ धावांची खेळी केली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीला दोन्ही सलामीवीर लयीत दिसत होते. बांगलादेशची पहिली विकेट ८.२ षटकांत ४५ धावांवर पडली. २४ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह २४ धावा काढून तन्जीद हसन बाद झाला. तथापि, यानंतर नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मेहदी हसन मेराजने १३ धावा, तौहीद हृदयॉयने ७, मुशफिकुर रहीमने २ आणि महमुदुल्लाहने ४ धावा केल्या. तथापि, कर्णधार नझमुल हुसेन शांतो एका टोकावर ठाम राहिला. त्याने ११० चेंडूत ९ चौकारांसह ७७ धावांची खेळी केली. यष्टीरक्षक झाकीर अली यानेही त्याला चांगली साथ दिली. झाकीरने ५५ चेंडूत ४५ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि १ षटकार लागला. फिरकी अष्टपैलू रियाज हुसेनने जलद धावा काढण्याचा प्रयत्न केला. त्याने २५ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. शेवटी, तस्किन अहमदनेही १० धावांचे योगदान दिले.
न्यूझीलंडकडून फिरकी अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल याने शानदार गोलंदाजी केली. त्याने १० षटकांत २६ धावा देत चार विकेट्स घेतल्या. याशिवाय, विल्यम ओरुकला दोन यश मिळाले.