नागपूर येथे दृष्टीबांधितांसाठीच्या बुद्धिबळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद

  • By admin
  • February 25, 2025
  • 0
  • 47 Views
Spread the love

नागपूर : आशादीप आणि बुद्धिबळ संघटना नागपूर यांच्यातर्फे दृष्टीबाधितांसाठी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत ग्यानीराम गट आणि रायसोनी गट यांनी विजेतेपद पटकावले.

आशादीप आणि बुद्धिबळ असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ संशोधन मंडळ, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे डोळस आणि दृष्टीबाधित यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन विदर्भ संशोधन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पराग पांढरीपांडे आणि यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख सुनील देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना पराग पांढरीपांडे यांनी बुद्धिबळ हा अतिशय पुरातन खेळ असून त्यामधून स्मरणशक्ती, एकाग्रता, धाडस, निर्णय क्षमता, व्यवस्थापन, इत्यादी गुणांचा विकास होतो.’ असे प्रतिपादन इतिहासातील समर्पक उदाहरणे देऊन केले. डॉ सुनील देशपांडे यांनी डी गुकेश, प्रज्ञानंद आणि दिव्या देशमुख आदी भारतीय ग्रँडमास्टर्सांचे उदाहरणे देऊन खेळातील आपल्या आणि इतरांच्या चुकांचा अभ्यास आणि सातत्य हेच यशाचे गमक आहे असे सुचविले.

समाजभान वाढविणाऱ्या या विशेष बुद्धिबळ स्पर्धेत ३० डोळस व ३० दृष्टीबाधित खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी ६ दृष्टीबाधित आणि ६ डोळस चमूंमध्ये प्रत्येकी ५ खेळाडू म्हणजे ५ बोर्ड होते. अतिशय उत्साही वातावरणात स्पर्धेचे चार राउंड खेळण्यात आले, तसेच टीम मध्ये समावेश नसलेल्या हौशी दृष्टीबाधित खेळाडूंना देखील उपस्थित डोळस व्यक्तींबरोबर खेळण्याची संधी देण्यात आली.

स्पर्धेच्या समारोप प्रसंगी आर्किटेक्ट राजेंद्र डोंगरे आणि राष्ट्रीय अंध बुद्धिबळ संघटनेचे सचिव डॉ मनीष थुल यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. बुद्धिबळ हा एकमेव खेळ आहे जो अंध व्यक्तींना नियमात कुठलीही शिथिलता न आणता सामान्यांच्या बरोबरीने खेळता येतो. त्यामुळे हा खरा दिव्यांग समावेशक खेळ आहे असे सांगितले. दोन्ही गटांमधून प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या चमूना, तसेच अतिरिक्त खेळाडूंमधून प्रथम वा द्वितीय क्रमांकाची खालील पारितोषिके देण्यात आली.

या शिवाय प्रत्येक बोर्ड वरील उत्कृष्ट खेळाडू बरोबरच मानवतकर यांनी प्रयोजित केलेले स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दृष्टीबाधित महिला खेळाडू पारितोषिक तीजन गावर हिला आणि सर्वांत लहान खेळाडूचे पारितोषिक खुशी खुरसंगे हिला देण्यात आले. विदर्भ चेस असोसिएशनचे पदाधिकारी भूषण श्रीवास, सच्चिदानंद सोमण, आर्बिटर शिवा अय्यर आणि अमित टेम्भुर्णे यांचाही सत्कार करण्यात आला. मंजिरी देशपांडे, प्रोजेक्ट मॅनेजर मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशन, हैद्राबाद या स्पर्धेच्या प्रायोजक होत्या.

प्रियदर्शनी काॅलेज ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या स्वयंसेवकांनी स्पर्धेच्या प्रबंधनात उत्कृष्ट सहकार्य केले. तसेच योद्धा ढोल-ताशा पथक, नागपूर यांनी सामाजिक जाणिवेतून बुद्धिबळपट घेण्यास आर्थिक सहाय्य दिले. या प्रसंगी आशादीप संस्थेकडून ज्ञानज्योती निवासी अंध विद्यालय, नागपूर यांना ब्रेलमधील पुस्तक संच भेट दिला. प्रारंभी आशादीप संस्थेच्या अध्यक्ष डॉ प्रतिमा शास्त्री यांनी स्पर्धेची भूमिका स्पष्ट केली आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वृंदा जोगळेकर यांनी केले. डॉ अनघा नासेरी यांनी आभार मानले.

अंतिम निकाल

दृष्टीबाधित प्रथम :.ग्यानीराम गट
दृष्टीबाधित द्वितीय : मानवतकर गट
डोळस प्रथम : रायसोनी गट
डोळस द्वितीय : ज्येष्ठ खेळाडू गट
अतिरिक्त खेळाडू प्रथम :राज जगदेव गडकुले
अतिरिक्त खेळाडू द्वितीय : वैष्णवी नेहरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *