
यश यादव, उबेद खान यांची दमदार शतके, सुपर लीग गटात प्रवेश
धुळे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत नांदेड संघाने लातूर संघाचा एक डाव आणि ९३ धावांनी पराभव केला. या विजयामुळे नांदेड संघ सुपर लीग सामन्यांसाठी पात्र ठरला आहे. नांदेडचा यश यादव हा सामनावीर ठरला.
धुळे येथील एमसीएस क्रिकेट मैदान कुंडणे या ठिकाणी नांदेड व लातूर यांच्यात सामना झाला. लातूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लातूर संघाचा पहिला डाव ४०.५ षटकात ९९ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर नांदेड संघाने पहिल्या डावात ६१.५ षटकात सर्वबाद ३११ धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व मिळवले. लातूर संघाचा दुसरा डाव ४०.२ षटकात ११९ धावांवर रोखून नांदेड संघाने हा सामना एक डाव आणि ९३ धावांनी जिंकला. या दणदणीत विजयाने नांदेड संघ सुपर लीगसाठी पात्र ठरला आहे.
या सामन्यात नांदेडच्या यश यादव व उबेद खान यांनी शानदार शतके झळकावली. यश यादव याने १४४ चेंडूत १०७ धावा फटकावल्या. त्यात त्याने १५ चौकार मारले. उबेद खान याने ९४ चेंडूत १०६ धावांची आक्रमक खेळी साकारली. या शतकी खेळीत त्याने दोन षटकार व १५ चौकार मारले. अभिजीत नागरगोजे याने चार चौकारांसह ३९ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत नांदेडच्या यश यादव याने ३० धावांत पाच विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. लातूरच्या विशाल धुमाळ याने ९१ धावांत पाच विकेट घेतल्या. आदर्श यादव याने २१ धावांत चार गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : लातूर संघ : पहिला डाव : ४०.५ षटकात सर्वाबद ९९ (अभिजीत नागरगोजे ३९, एम डी मुहम्मद नाबाद ३१, आदर्श यादव ४-२१, काझी शमशुझामा ४-४६, रुशी पुयाड २-१०).
नांदेड संघ : पहिला डाव : ६१.५ षटकात सर्वबाद ३११ (उबेद खान १०६, यश यादव नाबाद १०७, आदित्य घोगरे १०, आमेर लाला १७, आदर्श यादव १४, फरहान शेख १९, रुशी पुयाड ११, विशाल धुमाळ ५-९१, एम डी मुहम्मद २-६०, चैतन्य लवटे १-१२, विशाल जाधव १-२०, ऋषिकेश घुले १-३८).
लातूर संघ : दुसरा डाव : ४०.२ षटकात सर्वबाद ११९ (गणेश साळी ३३, अभिजीत नागरगोजे ३४, ओम जाधव १९, ऋषिकेश देशमुख १३, यश यादव ५-३०, काझी शमशुझामा ४-४८, आदित्य घोगरे १-७). सामनावीर : यश यादव.