नियमांच्या चौकटीत राहून त्वेषाने खेळा : दिलीप वेंगसरकर

  • By admin
  • February 25, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

मांडवी मुस्लिम क्रिकेट क्लबला विजेतेपद 

मुंबई : ‘खेळाच्या मैदानात त्वेषाने खेळा, पण नियमांच्या चौकटीत राहून, असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ११ वर्षाखालील मुलांच्या ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सांगितले. 

ओव्हल मैदान, चर्चगेट येथील अकादमीच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेत युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना दिलीप वेंगसरकर म्हणाले की, ‘क्रिकेट हा एक विलक्षण खेळ असून या खेळातून तुम्ही मित्र जोडा आणि प्रेमाचा प्रसार करण्याचा संदेश देखील त्यांनी दिला. या खेळातून एकदा का मैत्री झाली की ती आयुष्यभरासाठी टिकते असे देखील ते पुढे म्हणाले. 

माजी क्रिकेटपटू राजू परुळेकर यांनी देखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वेंगसरकर हे एकमेव माजी कसोटीपटू आहेत ज्यांनी ‘ग्रास रूट लेव्हल’ वरील मुलांसाठी अतुलनीय काम केले असून त्यांच्या अकादमीच्या माध्यमातून हजारो मुलांचे भारतासाठी किंवा आयपीएल मध्ये खेळण्याचे स्वप्न साकार झाले असल्याचे सांगितले.

दरम्यान मांडवी मुस्लिम क्रिकेट क्लब संघाने कॉम्रेड क्रिकेट अकादमी संघावर केवळ दोन धावांनी सनसनाटी विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मांडवी मुस्लिम क्रिकेट क्लब संघाने निर्धारित ३५ षटकांत ७ बाद १४१ धावा केल्या. यात युवान जैन (४०) आणि अंश गुप्ता (२६) यांनी प्रमुख धावा केल्या. शौर्य दुसी (२-१३) आणि ओम ढेम्बरे (२-२९) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. 

या आव्हानाचा पाठलाग करताना कॉम्रेड क्रिकेट अकादमी संघासाठी हित अकोला (३७), अमेय ढेम्बरे (१८), अर्जुन नाईकसाटम (१९), वंश एम. (१६) आणि ओम ढेम्बरे (१३) यांनी झुंजार प्रयत्न केले. एकवेळ त्यांनी ५ बाद १२० अशी मजल मारली होती, मात्र उर्वरित ५ फलंदाज १९ धावांत तंबूत परतल्याने त्यांचा डाव ३३.२ षटकांत १३९  धावांत आटोपला आणि त्यांना केवळ दोन धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अंश गुप्ता (२-२९) आणि अक्षत जोशी (२-२९) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत संघाचा विजय साकारला.

अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून युवान जैन याची निवड करण्यात आली.  स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कॉम्रेड क्रिकेट अकादमीच्या शौर्य दुसी ( १०१ धावा आणि ९ बळी) याची निवड करण्यात आली तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून युग सोलंकी (कॉम्रेड, ९ बळी) याची तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून कानिश दळवी – मांडवी मुस्लिम संघ (एका शतकासहित २६४ धावा) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू राजू परुळेकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

 
संक्षिप्त धावफलक : मांडवी मुस्लिम क्रिकेट क्लब : ३५ षटकांत ७ बाद १४१ (कानिश दळवी १४, अक्षत जोशी १८, युवान जैन ४४, अंश गुप्ता २६; शौर्य दुसी १-१३, ओम ढेम्बरे २-२९) विजयी विरुद्ध कॉम्रेड क्रिकेट अकादमी : ३३.२ षटकांत सर्वबाद १३९ (हित अकोला ३७, अमेय ढेम्बरे १८, अर्जुन नाईकसाटम १९, वंश एम १६, ओम ढेम्बरे १३, अंश गुप्ता २-२९, अक्षत जोशी २-२९). सामनावीर युवान जैन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *