
छत्रपती संभाजीनगर येथे २ मार्च रोजी स्पर्धा रंगणार
छत्रपती संभाजीनगर : जी एच रायसोनी मेमोरियल छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग चेस टूर्नामेंट २ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
एक दिवसीय फिडे रेटिंग स्पर्धा जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन आणि कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने हिमालया पब्लिक स्कूल, बीड बायपास, अर्जुन नगर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या स्पर्धेला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि फिडे यांची मान्यता प्राप्त आहे.
या स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अव्वल १५ विजेत्यांना रोख बक्षिसांसह, सर्वोत्तम अनुभवी खेळाडू (५५ प्लस), सर्वोत्तम महिला खेळाडू (१८ प्लस), सर्वोत्तम छत्रपती संभाजीनगर खेळाडू आणि सर्वोत्तम अनरेटेड खेळाडू यांनाही रोख बक्षिसे दिली जातील. तसेच, अंडर ७, ९, ११, १३, १५ गटांतील मुला-मुलींना आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा ९ फेऱ्यांमध्ये रॅपिड टाइम फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. त्यामध्ये १० मिनिटे आणि प्रत्येक चालीसाठी ५ सेकंदांची वाढ असणार आहे. हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय मास्टर कुशाग्र मोहन आणि तामिळनाडूच्या रामनाथन बालसुब्रमण्यम यांनी या स्पर्धेसाठी सहभाग निश्चित केला आहे. तसेच, फिडे मास्टर वेदांत पानेसर आणि सुयोग वाघ यांनीही सहभाग निश्चित केला आहे. विलंब शुल्काशिवाय प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी एक आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश व्यास आहेत. तसेच, आयोजक सचिव म्हणून कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशनचे सचिव भूषण श्रीवास, आयोजन समिती सदस्य एस एस सोमन, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, फिडे आर्बिटर अमरीश जोशी आणि जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य हे परिश्रम घेत आहेत. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडून मुंबईचे आंतरराष्ट्रीय आर्बिटर अजिंक्य पिंगळे यांना या स्पर्धेचे मुख्य आर्बिटर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले आणि रायसोनी ग्रुपचे संचालक (प्रोजेक्ट्स) डॉ मृणाल नाईक यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.