डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ खेळाडूंची गरुड भरारी 

  • By admin
  • February 25, 2025
  • 0
  • 114 Views
Spread the love

आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात अॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन, खो-खो, बास्केटबॉल स्पर्धेत घवघवीत यश 

छत्रपती संभाजीनगर : २६व्या महाराष्ट्र क्रीडा महोत्सव स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन, खो-खो व बास्केटबॉल या संघांनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले आहे. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्हॉलिबॉल संघाने पुरुष गटात  विजेतेपद पटकावले. विद्यापीठाचा महिला बुद्धिबळ विजेता ठरला. खो-खो स्पर्धेत विद्यापीठाच्या पुरुष संघाने उपविजेतेपद मिळवले. बॅडमिंटन पुरुष संघाने उपविजेतेपद पटकावले. तसेच बास्केटबॉल पुरुष संघाने तृतीय क्रमांक मिळवला. अॅथलेटिक्स स्पर्धेत एक सुवर्ण तर पाच रौप्य पदक अशी शानदार कामगिरी विद्यापीठ खेळाडूंनी नोंदवली आहे. बाहेरच्या विद्यापीठात जाऊन अशी शानदार कामगिरी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळाडूंनी पहिल्यांदा केली आहे. विविध स्पर्धांमध्ये विद्यापीठ संघाने वर्चस्व गाजवत यश संपादन केले आहे हे विशेष. 

२६व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १७ ते २२ फेब्रुवारी या कालावाधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस व बुद्धिबळ पुरुष व महिला संघांच्या १५२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. 

क्रीडा महोत्सव स्पर्धेत विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स पुरुष व महिला, व्हॉलिबॉल पुरुष, बुद्धिबळ महिला, बॅडमिंटन पुरुष, खो-खो पुरुष व बास्केटबॉल पुरुष गटांच्या संघाने घवघवीत यश संपादन केले.

विद्यापीठाच्या व्हॉलिबॉल पुरुष संघाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या विजेत्या संघात कौशिक शेलोटकर, संकेत पाटील, जीवन पवार, सय्यद अर्षद अली, रिझवान शाह, प्रथमेश गंगावणे, प्रणय बोरकर, जीवक वाघमारे, सौरभ मांजरे, सय्यद मुजतहीद, रोहित पांडे, व दुर्गेश सोनार यांचा समावेश होता.

व्हॉलिबॉल संघाचा दबदबा कायम 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्हॉलिबॉल पुरुष संघाने २६व्या क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणे गट ड मध्ये खेळत असताना प्रथम सामन्यात डॉ होमी बाबा स्टेट विद्यापीठ, मुंबई या संघास सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून स्पर्धेची सुरेख सुरुवात केली. त्यानंतर सलग कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपूर या संघास सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले, त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या संघात देखील सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले व पुल स्टेज मधील अंतिम सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या बलाढ्य संघाला एकतर्फी सरळ दोन सेट मध्ये पराजित करून गट ड मध्ये एकतर्फी पुल टॉप करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी सामन्यात मुंबई विद्यापीठ संघाला देखील एकतर्फी पराभूत करत सरळ तीन सेट मध्ये सामना जिंकला. अंतिम सामन्यात विद्यापीठ संघाचा सामना हा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या संघाशी झाला. या अंतिम सामन्यात देखील विद्यापीठ संघाने एकतर्फी तीन सेट मध्ये विजय साकारत पुन्हा एकदा विद्यापीठासाठी सुवर्ण पदक पटकावले.या स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या व्हॉलीबॉल पुरुष संघाचे ओव्हरऑल एकतर्फी दबदबा कायम ठेवत कोविड कार्यकाळानंतर सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. विद्यापीठासाठी व्हॉलिबॉल पुरुष संघाने सुवर्ण पदकाची हॅटट्रिक नोंदवली आहे हे विशेष.  या संघास विद्यापीठाचे व्हॉलिबॉल प्रशिक्षक अभिजीत दिखत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघ व्यवस्थापक म्हणून आशिष शुक्ला यांनी काम पाहिले.

बुद्धिबळ संघाचे सोनेरी यश 
विद्यापीठाच्या महिला बुद्धिबळ संघाने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन करीत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. या स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघात संस्कृती वानखेडे, भाग्यश्री पाटील, तनिष्का बोरामणीकर, सानिया तडवी व संघमित्रा बोदडे यांचा समावेश होता. या संघास प्रशिक्षक विलास राजपूत आणि डॉ नेहा माने, डॉ निलेश गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

अॅथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी 
या स्पर्धेतील अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात विद्यापीठाच्या पुरुष व महिला खेळाडूंनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. किशोर मरकड याने ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. अर्जुन शिंदे याने १५०० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले. ओंकार पडवळ याने थाळीफेक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. सुरेखा आडे हिने भालाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावले. कल्पना मळकामी हिने तिहेरी उडी प्रकारात सुवर्णपदक जिंकून आपला ठसा उमटवला. कल्पना मडकामी हिने लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकत या स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. पुरुष संघास डॉ सुहास यादव यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. महिला संघाक प्रशिक्षक म्हणून डॉ सीमा मुंढे यांनी मार्गदर्शन केले. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ राम जाधव यांनी काम पाहिले.

खो-खो संघाला उपविजेतेपद

विद्यापीठाच्या खो-खो पुरुष संघाने उपविजेतेपद पटकावत विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला. उपविजेत्या संघात सचिन पवार, रमेश वसावे, सोहन गुंड, तेजस सावंत, श्रीशंभु पेठे, विजय शिंदे, रोहित चव्हाण, ओंकार दळवी, आनंद सताले, शाम शोभले, अनिकेत पवार व रुद्र थोपटे यांचा समावेश होता. या संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ युसूफ पठाण व संघ व्यवस्थापक म्हणून डॉ हेमंत वर्मा यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.

बॅडमिंटन संघाला उपविजेतेपद 
विद्यापीठाच्या बॅडमिंटन पुरुष गटाने देखील अनपेक्षितरित्या मुसंडी मारत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या उपविजेत्या संघात निनाद कुलकर्णी, प्रथमेश कुलकर्णी, सदानंद महाजन व सिद्धेश्वर वेदांत यांचा समावेश होता. या संघास प्रशिक्षक म्हणून चेतन तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ राजेश क्षीरसागर यांनी काम पाहिले.

बास्केटबॉल संघाची चमकदार कामगिरी 
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बास्केटबॉल पुरुष संघाने  तृतीय क्रमांक संपादन केला. एच एस एन सी विद्यापीठ, मुंबई संघाचा ७०-५८ बास्केटने सहज पराभव करीत विद्यापीठ संघाने तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक पटकावलेला बास्केटबॉल पुरुष संघात विपूल कड, जयराज तिवारी, नरेंद्र चौधरी, अमन शर्मा, अनिमेश म्हस्के, साहिल सय्यद, सुमित पवार, अझमत खान, कृष्णकांत शिरोळे, सौरभ ढिपके, प्रणव कोळेश्वर व आदित्य तळेकर या खेळाडूंचा समावेश होता. या संघास डॉ. जमीर सय्यद यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले.  मुख्य प्रशिक्षक म्हणून गणेश कड यांच्याकडे जबाबदारी होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बास्केटबॉल संघाने साखळी फेरीत अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाचा ६५-५१ बास्केटने, अमरावती विद्यापीठ संघाचा ५४-३२ बास्केटने, अकोला विद्यापीठ संघाचा ५२-१६ बास्केटने, तर दापोली विद्यापीठ संघाचा ५५-९ बास्केटने पराभूत करीत अव्वल स्थान राखले. उपांत्य फेरीत मुंबई विद्यापीठ मुंबई संघासोबत झालेल्या प्रेक्षणीय लढतीत ६३-६४ केवळ एक बास्केटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाच्या लढतीत एच एस एन सी विद्यापीठाचा ७०-५८ बास्केटच्या फरकाने सहज पराभव करीत स्पर्धेतील तृतीय क्रमांक पटकावला. संघाचे प्रमुख म्हणून डॉ संतोष वनगुजरे व डॉ विलास तांगडे यांनी काम पहिले.

कुलगुरूंकडून कौतुक 
क्रीडा महोत्सव स्पर्धेतील विद्यापीठाच्या घवघवीत यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रोफेसर डॉ प्रशांत अमृतकर, वित्त व लेखाधिकारी सविता जांपावाड, प्र-क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, तसेच क्रीडा विभागातील प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, अभिजित दिखत, डॉ मसूद हाश्मी, किरण शूरकांबळे, गणेश कड, रामेश्वर विधाते व मोहन वाहिलवर आदींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

कोट 

गोंडवाना विद्यापीठात झालेल्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विविध क्रीडा प्रकारांत घवघवीत यश संपादन केले. विद्यापीठासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कुलगुरू यांचा भक्कम पाठिंबा तसेच विद्यापीठ प्रशासनाचा खेळाडूंना देण्यात येणाऱ्या आधुनिक सुविधांमध्ये खेळाडूंनी यशाला गवसणी घातली आहे. बाहेरच्या विद्यापीठात जाऊन अशी कामगिरी विद्यापीठ खेळाडूंनी पहिल्यांदा केली आहे आणि त्यामुळे या यशाचे महत्त्व अधिक आहे. विद्यापीठ प्रशासनाने उत्कृष्ट प्रशिक्षक, सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच खेळाडूंची निवड अतिशय पारदर्शकपणे होत आहे. त्याचे हे फलित आहे. 

– डॉ संदीप जगताप, प्र-क्रीडा संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *