
छत्रपती संभाजीनगर : बारा वर्षाखालील एमएसएलटीए वूड्रिज राष्ट्रीय रॅकिंग चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरी प्रकारात सोलापूरच्या केशव भैय्या आणि नाशिकच्या भूमी भालेराव यांनी विजेतेपद पटकावले.
१२ वर्षांखालील मुले व मुली राष्ट्रीय टेनिस स्पर्धा वूड्रिज शाळेच्या टेनिस कोर्टवर पार पडली. या स्पर्धेत ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा एकेरी व दुहेरी प्रकारात घेण्यात आली. ही स्पर्धा एमएसएलटीए, वूड्रिज आणि ग्रँडमास्टर कंपनी यांच्या सयोजनांनी आयोजित करण्यात आली होती.
मुलांच्या गटात एकेरी अंतिम सामन्यात सोलापूरच्या केशव भैय्या याने सोलापूरच्या आर्य पवार याचा ६-३, ७-६ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात नाशिकच्या भूमी भालेराव हिने छत्रपती संभाजीनगरच्या रिया कुलकर्णीचा ६-३, ६-२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील विजेत्यांना ग्रँडमास्टर कंपनीच्या डायरेक्टर मोहिनी केळकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी वूड्रिज हायस्कूलचे अध्यक्ष दीपक कोठारी, स्पर्धेचे आयोजक विशाल औटे आणि स्पर्धेचे सुपरवाझर प्रवीण गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
उपांत्य फेरीचा निकाल
मुले : केशव भैय्या (सोलापूर) विजयी विरुद्ध समान्यू जैन (जळगाव) ६-१, ६-२, आर्य पवार (सोलापूर) विजयी विरुद्ध अरिंजय बंग (नांदेड) ६-२, २-६, ६-२.
मुलींचा गट : भूमी भालेराव (नाशिक) विजयी विरुद्ध श्रीनिधी कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर) ६-४, ६-४, रिया कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर) विजयी विरुद्ध इशिता पाटील (पुणे) ६-४, ६-०.