पी आर श्रीजेश यांना जनकल्याण समितीचा ‘श्रीगुरुजी पुरस्कार’

  • By admin
  • February 25, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

पुणे : राजस्थानमधील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी आर श्रीजेश यांना यंदाचा ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुण्यात शनिवारी, १ मार्च रोजी होणार्‍या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा स गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा ३० वे वर्ष आहे. जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ अजित मराठे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. संस्थेचे कार्यवाह प्रमोद गोर्‍हे यावेळी उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे आहे. या पुरस्कारासाठी यंदा  कृषी आणि क्रीडा ही क्षेत्र निश्चित करण्यात आली होती, असे डॉ मराठे यांनी सांगितले.

संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाचे सहसरकार्यवाह डॉ कृष्णगोपालजी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. पुरस्कार प्रदान समारंभ शनिवार, १ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होईल.

‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि पी आर श्रीजेश यांचे त्यांच्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या या कार्याचा सन्मान पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान करून केला जाईल. पुणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या कार्याला प्रोत्साहित करावे, असे आवाहन ‘जनकल्याण समिती’तर्फे करण्यात आले आहे.

‘जनकल्याण समिती’ची सेवाकार्य
‘जनकल्याण समिती’तर्फे महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पूर्वांचल विकास, दिव्यांग कल्याण या पाच प्रमुख क्षेत्रात तेरा मोठे प्रकल्प चालवले जात आहेत. त्यात प्रामुख्याने रुग्णालय, तीन रक्तकेंद्र, पूर्वांचल वसतिगृह, पुण्यातील सेवा भवन, दिव्यांगांसाठी विविध प्रकल्प या सेवाकार्यांचा समावेश आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *