
रणजी ट्रॉफी फायनल बुधवारपासून
सतीश भालेराव
नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विदर्भ आणि केरळ यांच्यात बुधवारपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. ७४ वर्षांनी केरळ संघाने अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे विदर्भ संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा विदर्भ संघ हा केरळ संघाला वरचढ ठरेल. अंतिम सामन्यात विदर्भ संघाचा सध्याचा फॉर्म आणि घरच्या मैदानावर खेळण्याचा होणारा फायदा यामुळे विदर्भ संघ केरळ संघाविरूद्ध फेव्हरिट म्हणून सुरुवात करेल.
अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने या हंगामात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. विदर्भ संघाने आतापर्यंत नऊपैकी आठ सामने जिंकले आहेत आणि एक सामना बरोबरीत सोडवला आहे. उपांत्य फेरीत विदर्भ संघाने बलाढ्य मुंबई संघाचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरीत गाठली आहे.
विदर्भ संघाने गट टप्प्यात सात पैकी सहा सामने जिंकले. त्यानंतर, विदर्भ संघाने क्वार्टर फायनलमध्ये तामिळनाडूचा १९८ धावांनी आणि सेमीफायनलमध्ये गतविजेत्या मुंबईचा ८० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. विदर्भ २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये रणजी चॅम्पियन बनला तर केरळ संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. विदर्भ संघाने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी अंतिम फेरीत विदर्भ संघ मुंबईकडून पराभूत झाला होता आणि या वर्षी विदर्भ संघ त्याची भरपाई करेल यात शंकाच नाही. विदर्भ संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. विदर्भ संघाने यावर्षी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील प्रवेश केला.
विदर्भाच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी
या हंगामात विदर्भाच्या फलंदाजांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. यश राठोडने ५८.१३ च्या सरासरीने ९३३ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधार अक्षय वाडकर याने आघाडीवरून नेतृत्व केले आहे. त्याने ४८.१४ च्या सरासरीने ६७४ धावा केल्या आहेत. अनुभवी फलंदाज करुण नायरही त्याच्या मागे नाही. त्याने ४५.८५ च्या सरासरीने ६४२ धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय, दानिश मालेवारने ५५७ धावा करून आपली भूमिका चांगली बजावली आहे आणि ध्रुव शोरेने ४४६ धावा केल्या आहेत.
गोलंदाजांनीही वर्चस्व गाजवले
गोलंदाजीत, २२ वर्षीय हर्ष दुबेने विदर्भासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत ६६ विकेट्स घेतल्या आहेत आणि रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमापासून तो फक्त दोन विकेट्स दूर आहे. हा विक्रम बिहारच्या आशुतोष अमनच्या नावावर आहे ज्याने २०१८-१९ च्या हंगामात ६८ विकेट्स घेतल्या.
गुजरातला हरवून केरळ संघ अंतिम फेरीत
दुसरीकडे, सचिन बेबीच्या नेतृत्वाखालील केरळ संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला असेल, तर त्यात नशिबाचीही मोठी भूमिका आहे. क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी जम्मू आणि काश्मीरचा फक्त एका धावेने पराभव केला, तर उपांत्य फेरीत गुजरातविरुद्ध पहिल्या डावात दोन धावांच्या किरकोळ आघाडीच्या आधारे ते अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाले.
सलमान निजार आणि मोहम्मद अझरुद्दीन हे केरळच्या फलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. चालू हंगामात आतापर्यंत निझारने ८६.७१ च्या सरासरीने ६०७ धावा केल्या आहेत तर अझरुद्दीनने ७५.१२ च्या सरासरीने ६०१ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, जलज सक्सेना केरळसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ३८ विकेट्स घेतल्या आहेत. विदर्भाचा माजी खेळाडू आदित्य सरवटेने ३० विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली आहे.
विदर्भ संघ
अक्षय वाडकर (कर्णधार, अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वखारे, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, नचिकेत भुते, सिद्धेश वाथ (यष्टिरक्षक), यश ठाकूर, दानिश मालेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शौरे.
केरळ संघ
सचिन बेबी (कर्णधार), रोहन कुन्नुमल, सलमान निजार, मोहम्मद अझरुद्दीन (यष्टीरक्षक), अक्षय चंद्रन, जलज सक्सेना, शॉन रॉजर, आदित्य सरवटे, बासिल थंपी, एमडी निधीश, नेदुमकुझी बासिल, श्रीहरी एस नायर, शराफुद्दीन एनएम, आनंद कृष्णन, वरुण नयनर, एडन अॅपलटन, अहमद इम्रान.