
छत्रपती संभाजीनगर-पुणेरी बाप्पा सामना अनिर्णित
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर पुणेरी बाप्पा संघावर बाजी मारली. हा सामना अनिर्णित राहिला. मात्र, छत्रपती संभाजीनगर संघाने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्वप्नील चव्हाण हा सामनावीर ठरला.
सार्क क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात ६१.५ षटकात सर्वबाद २६४ धावसंख्या उभारली. त्यानंतर पुणेरी बाप्पा संघाचा पहिला डाव ५१.५ षटकात २०२ धावांवर रोखून पहिल्या डावात ६२ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. छत्रपती संभाजीनगर संघाने दुसरा डाव २० षटकात सहा बाद १६९ धावसंख्येवर घोषित केला. पुणेरी बाप्पा संघाने ४० षटकात सहा बाद २१० धावा फटकावत सामना अनिर्णित ठेवला.
या सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या स्वप्नील चव्हाण याने ४२ चेंडूत ६६ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने आठ चौकार व तीन षटकार मारले. ऋषिकेश नायर याने ७८ चेंडूत ६६ धावांची दमदार खेळी केली. त्याने चार षटकार व आठ चौकार मारले. पुणेरी बाप्पा संघाच्या ऋषिकेश दौंड याने ६१ चेंडूत ७५ धावा फटकावल्या. त्याने तीन षटकार व आठ चौकार मारले. या लढतीत धीरज थोरात (५७), आनंद ठेंगे (४६) यांनीही चमकदार खेळी केली.
गोलंदाजीत छत्रपती संभाजीनगरच्या श्रीनिवास लेहेकर याने ४२ धावांत सहा विकेट घेतल्या. स्वप्नील चव्हाण याने ३५ धावांत चार विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. पुणेरी बाप्पा संघाच्या आदित्य मोरे याने ६० धावांत चार गडी बाद केले.