
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत सचिन लव्हेरा याच्या नाबाद ९० धावांच्या बळावर सेंट्रल झोन संघाने पहिल्या डावात पाच बाद १९६ धावा काढल्या आहेत. तत्पूर्वी, किंग्ज स्पोर्ट्स क्लबने पहिल्या डावात सर्वबाद २६५ धावा काढल्या आहेत.
उरवडे क्रिकेट मैदानावर हा सामना होत आहे. किंग्ज स्पोर्ट्स क्लबने ५२.१ षटकात सर्वबाद २६५ धावसंख्या उभारली. त्यात अभिजीत पवार (८६), अजिंक्य गायकवाड (५१) यांनी शानदार अर्धशतके ठोकली. निश्चय नवले (२१), सार्थक वाल्के (१९), आदित्य पांडे (२०), शुभम वर्मा (नाबाद १९) यांनी आपले योगदान दिले. गौरव शिंदे याने ५० धावांत चार विकेट घेतल्या. आदर्श बागवाले याने ३० धावांत तीन गडी बाद केले. सौरव मोरे याने ५६ धावांत दोन बळी घेतले. मयंक लोढा याने ३० धावांत एक बळी घेतला.
सेंट्रल झोन संघाने पहिल्या दिवसअखेर ३०.३ षटकांच्या खेळात पाच बाद १९६ धावा काढल्या आहेत. सेंट्रल झोन संघ अद्याप ६९ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार सचिन लव्हेरा याने ६५ चेंडूत नाबाद ९० धावांची धमाकेदार खेळी साकारली आहे. शतकासाठी सचिनला अवघ्या १० धावांची गरज आहे. या आक्रमक खेळीत सचिनने सहा उत्तुंग षटकार व नऊ चौकार ठोकले आहेत. सम्राट राज याने ४१ चेंडूत ६१ धावांची आक्रमक खेळी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. त्याने सहा षटकार व चार चौकार मारले. मोहित चौधरी (१५), आदर्श बागवाले (१९) यांनी आपले योगदान दिले. सार्थक वाल्के याने ३९ धावांत चार विकेट घेतल्या आहेत. आदित्य पांडे याने ३७ धावांत एक गडी बाद केला.