
सोलापूर शहर व जिल्हा तलवारबाजी संघटना व ऑल स्टार फेन्सिंग क्लबच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर ः छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घडवण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांचे खूप मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंना घडवण्यासाठी त्यांच्या मातांनी खूप मोठे परिश्रम असून त्यामुळेच खेळाडू मैदानावर चांगली कामगिरी करतात, असे प्रतिपादन उद्योगवर्धिनीच्या संस्थापिक अध्यक्षा व माजी नगरसेविका चंद्रीकाताई शंभूसिंह चौहान यांनी केले.
सोलापूर शहर व जिल्हा तलवारबाजी संघटना व ऑल स्टार फेन्सिंग क्लबच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंच्या मातांचा गौरव समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक येथे चंद्रीकाताई चौहान यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्राचार्या मंजुश्री पाटील सपाटे, बी एफ दमानी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका ज्योत्स्ना मळेकर व श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक योगेश राऊत उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली त्यांच्या ६० मातांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व मातां चंद्रकोर पैठणी व नथ घालून उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पोशाख साईलीला पुलगम, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख आदित्य माळी व छत्रपती संभाजी महाराजांच्या बाल पोशाख विघ्नेश वानकर या खेळाडूंनी परिधान केला होता.
प्रा दीपक शिंदे यांनी प्रस्ताविक केले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटुळे यांनी तलवारबाजी या खेळाचा झालेला विकास व त्यामध्ये आलेली आधुनिकता याबद्दल आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदा शिरवळ यांनी केले. ऑल स्टार फेन्सिंग क्लबचे सचिव पवन भोसले यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोहम साठे व वेदांत पवार सर्व खेळाडू वर्ग यांनी परिश्रम घेतले.