
एमआयटी डब्ल्यूपीयूत आंतर-विद्यापीठ व महाविद्यालय ‘समिट २०२५’ चे उद्घाटन
पुणे ः खेळाडू आणि शिक्षित व्यक्ती या दोन्ही गोष्टी देशाचे भविष्य आहे. त्यामुळे उच्च शिक्षित खेळाडूं म्हणजेच विद्यार्थ्यांचे भविष्य हे उज्ज्वल आहे. जीवनात चढ-उतार येतच असतात, असे विचार अर्जुन पुरस्कार सन्मानीत व पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राष्ट्रीय पातळीवरील आंतर-विद्यापीठ व महाविद्यालय ‘समिट २०२५’ या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीकांत पेटकर हे बोलत होते. अर्जुन पुरस्कार विजेत्या रेखा भिडे व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानीत योगेश धाडवे हे सन्मानीत पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस, प्र- कुलगुरू डॉ मिलिंद पांडे, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार डॉ मिलिंद ढमढेरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता मनोज एरंडे, पद्माकर फड आणि डब्ल्यूपीयूचे क्रीडा संचालक विलास कथुरे हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा डॉ विश्वनाथ दा कराड यांच्या आर्शीवादाने आणि डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ राहुल कराड यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे.
उद्घाटन समारंभात ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात अद्वितीय खेळी खेळल्याबद्दल अर्जुन पुरस्कार विजेत्या रेखा भिडे यांना ‘एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्युदो खेळातील शिवछत्रपती पुरस्कार सन्मानीत योगेश धाडवे यांना ‘एमआयटी डब्ल्यूपीयू क्रीडा आचार्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पद्मश्री मुरलीकांत पेटकर म्हणाले की, ‘एमआयटी डब्ल्यूपीयू हे देशातील असे पहिले विद्यापीठ आहे जेथे कुस्तीचा मातीचा आखाडा असून कोच सुद्धा आहे. विद्यार्थी खेळाडूंनी जीवनात देशातील जुने खेळाडू जे आहेत त्यांना विसरू नका. क्रीडा क्षेत्रात आता पर्यंत मी ४७६ सुवर्ण पदक जिंकले आहे.
योगेश धाडवे म्हणाले की, ‘या विद्यापीठाने क्रीडा संस्कृतीचे जतन केले आहे. ते सतत विद्यार्थ्यांना क्रीडा प्रति आंतरिक उर्जेसाठी प्रोत्साहित करीत असतात. खेळाडू सतत समाजाला प्रोत्साहित करत असतो. खेळाडूंनी सतत आपला हौसला बुलंद ठेवावा.”
रेखा भिडे म्हणाल्या की, ‘क्रीडा क्षेत्रात दृढ निश्चयी असून जिद्दी असावे. स्पोर्टस स्पीरिट व यूनिटी असल्यास देश प्रगती पथावर जाईल. क्रीडा हे व्यवस्थापनाचे विद्यापीठ आहे. स्वयं अनुशासन अत्यंत महत्वाचे आहे. खेळाडू हा सतत देशासाठी खेळतो.”
डॉ मिलिंद पांडे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी प्रत्येक पाऊलावर विश्वास निर्माण केल्यास त्यातून ते उद्याचे चॅम्पियन बनतील. जीवनात खूप अडचणी आहेत. त्यासाठी दोन पाऊले चालावे लागतील. संघर्ष हेच यशाचे रहस्य आहे.”
डॉ आर एम चिटणीस यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, खेळाचे सर्व कौशल्यांचा योग्य वापर करावा. यामुळे शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत राहते.
यावेळी विद्यार्थी शंतनू, कुहू खांडेकर, जिनेश नणंद, आर्या भागवत यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात यश मिळविल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थी रसल रॉबिन्सन व एरिशा यांनी सूत्रसंचालन केले. आर्यकी सायखडेकर हिने आभार मानले.