
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जल्लोष वातावरणात भूमीपूजन
छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय क्रीडा संकुल समिती मार्फत गारखेडा भागातील विभागीय क्रीडा संकुल येथे फुटबॉल मैदानासह ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले.
विभागीय क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते फुटबॉल मैदान व सिंथेटिक ट्रॅक उभारणीच्या कामाची सुरुवात मोठ्या थाटात करण्यात आली. याप्रसंगी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जालना जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमास जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ फुलचंद सलामपुरे, तांत्रिक अधिकारी डॉ दयानंद कांबळे, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी डॉ विजय पाथ्रीकर, डॉ मकरंद जोशी, डॉ उदय डोंगरे, डॉ रणजीत पवार, डॉ दिनेश वंजारे, तुषार आहेर, आनंद थोरात यांची उपस्थिती होती. तसेच विभागीय क्रीडा संकुलात विविध खेळांचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक मनजितसिंग दरोगा (बास्केटबॉल), विनोद माने (क्रिकेट), भिकन अंबे (स्केटिंग) यांच्यासह क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्यक्षात काम हवे ः पालकमंत्री
भूमिपुजन प्रसंगी फक्त उद्घाटनच नावापुरते नको तर प्रत्यक्षात काम हवे. संपूर्ण भारतात छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंचा नावलौकिक व्हावा त्याकरीता लवकरात लवकर ट्रॅकचे काम पूर्ण करावे असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सर्व खेळाडू, विद्यार्थी यांचा फक्त पोलीस भरतीकडे कल आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आरोग्यासाठी मैदानावरील खेळ खेळावे, आपल्या इथे सुविधा अपूर्ण असून देखील मुंबई नंतर छत्रपती संभाजीनगरचे फुटबॉल खेळाडू आघाडीवर आहेत. या फुटबॉल मैदान व ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅकमुळे खेळाडूंच्या आशा वाढल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करावे जेणे करून या छत्रपती संभाजीनगर मधून छावा व मावळे घडण्यास जोमाने सुरूवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पक्ष व प्रशासन यांनी एकत्र काम केले तर छत्रपती संभाजीनगरचा विकास झपाट्याने होईल अशी अपेक्षा केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले. क्रीडा विभागाच्या धोरण, सुविधा यांची माहिती युवराज नाईक यांनी यावेळी दिली.
जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी आभार मानले. श्यामसुंदर भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचे स्वागत एसआरपीएफ बँड पथक, गणपत पवार यांचे मार्गदर्शनाखाली बळीराम पाटील विद्यालयाचे लेझीम व बाजीराव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल एनसीसी पथकाद्वारे केले.