
कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने टीआरएस फाऊंडेशनतर्फे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुन तिवारी याने विजेतेपद पटकावले. सुदीप पाटील याने उपविजेतेपद संपादन केले.
पाटोदा शिवारातील चेस लँड या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम मानांकित अर्जुन तिवारी याने आठपैकी आठ गुणांची कमाई करत विजेतेपद पटकावले. अर्जुन तिवारी याने निशा स्पोर्ट्स अकादमीतर्फे प्रायोजित १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक संपादन केले. उपविजेत्या सुदीप पाटील याने आठपैकी ६.५ गुणांची कमाई केली. सुदीप याने रणजीत सिंग गुलाटी यांनी प्रायोजित केलेले सात हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक संपादन केले. कौस्तुभ वाघ याने ६.५ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. चंद्रकला नगर प्रायोजित पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक त्याला प्रदान करण्यात आले. नक्ष गांधी याने तीन हजार रुपयांचे चौथे पारितोषिक पटकावले. आर्यन चक्रवर्ती याने पाचवा तर शिवम ताम्हणे याने सहावा क्रमांक मिळवला. विहांग गणगण व संकल्प सोनवणे यांनी सातवा व आठवा क्रमांक संपादन केला. तसेच सार्थक शिंदे, श्रुती काळे, श्रेयांश नलावडे, मयुरेश समिंद्रे, रेणुका गोविंदवार, अर्णव सोनटक्के, वैभव लोखंडे यांना रोख पारितोषिक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत पहिली ते चौथी गटात भक्ती गवळी, स्वरा लढ्ढा, पाचवी ते आठवी गटात मोहित गांधी, अर्णव तोतला, नववी ते बारावी गटात प्रतीक इंगळे, वंशिका तिवारी यांनी अनुक्रमे रुक ट्रॉफी, बिशप ट्रॉफी, नाईट ट्रॉफी पटकावली. राजेंद्र सागर यांनी पॉन ट्रॉफी जिंकली. प्रियल शिखरेने क्वीन ट्रॉफी संपादन केली.
या स्पर्धेत २५ मानांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. एकूण ८० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ३१ हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना चंद्रकला नगरचे पी एम चोरडिया, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंद्र पटेल, उमेश जहागिरदार, सुदाम झोटिंग, तेजस्विनी सागर, सिया सागर, अंजली सागर यांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून अजय पटेल, विलास राजपूत, पाटील यांनी काम पाहिले.