नाशिक, पिंपरी चिंचवड, परभणी, सांगली उपांत्य फेरीत

  • By admin
  • February 26, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

मनमाड, नाशिक : ३५व्या किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत यजमान नाशिक शहरसह, पिंपरी चिंचवड, परभणी आणि सांगली यांनी दमदार खेळ करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. 


नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने माणकचंद ललवाणी इस्टेट (हेलिपॅड) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत काही अटीतटीच्या आणि काही एकतर्फी सामने पाहायला मिळाले.

नाशिक शहर संघाचा थरारक विजय
यजमान नाशिक शहर संघाने पुणे ग्रामीणवर शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायम ठेवत विजय मिळवला. नाशिकच्या ईशा दारोळे हिच्या निर्णायक चढायांनी संघाला विजय मिळवून दिला. सुरुवातीला पुणे ग्रामीणने आघाडी घेतली होती, विश्रांतीला ११-०९ अशा पिछाडीवर असलेल्या नाशिकने उत्तरार्धात जोरदार पुनरागमन करत सामना आपल्या बाजूने झुकवला. नाशिकच्या विजयात बिंदिशा सोनारच्या चढाया आणि सिद्धी कसबेच्या सुरेख पकडीने महत्त्वाची भूमिका बजावली. पुणे ग्रामीणकडून आरती खांडेकर, भूमिका माने आणि रचना बंड यांनी संघर्ष केला, मात्र शेवटी संघाला पराभव पत्करावा लागला.

सांगलीचा कमाल खेळ, नाशिक ग्रामीणचा पराभव
सांगलीने नाशिक ग्रामीणवर संघर्षपूर्ण लढतीत १५-१६ अशा पिछाडीवरून विजयी मुसंडी मारली. उत्कर्षा यादव आणि सानिका पाटील यांच्या तुफानी चढायांनी आणि पकडीच्या जबरदस्त खेळाने सामना शेवटच्या क्षणी सांगलीच्या बाजूने झुकवला. नाशिक ग्रामीणकडून सेजल काकडे आणि सायली खटाळे यांनी उत्तम खेळ केला, मात्र उत्तरार्धात त्यांचा खेळ अपेक्षेप्रमाणे उंचावला नाही.

परभणी संघाचा शानदार विजय
परभणी संघाने जालनाला मोठ्या फरकाने पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. हाफ टाइमपर्यंत सामना अटीतटीचा होता, २१-२० अशी जालनाकडे आघाडी होती, मात्र उत्तरार्धात परभणीच्या यशश्री इंगोले आणि श्रावणी कुलकर्णी यांच्या तुफानी खेळाने सामना एकतर्फी केला. परभणीने ३ लोण मिळवत जालनाच्या संघाला पराभूत केले. जालनाकडून कल्याणी शिंदे आणि नंदा नागवे यांनी चमक दाखवली, मात्र उत्तरार्धात त्या प्रभावी ठरल्या नाहीत.

पिंपरी चिंचवड संघाचा दणदणीत विजय
शेवटच्या सामन्यात पिंपरी चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वचा सहज पराभव करत उपांत्य फेरी गाठली. सामन्याच्या पहिल्या डावातच ३ लोण मिळवत पिंपरी चिंचवडने आघाडी घेतली आणि दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत गुणसंख्या अर्धशतक पार केली. समृद्धी लांडगे आणि संतोषी थोरवे यांच्या आक्रमक चढायांनी आणि सोनाक्षी वाबळे, सिद्धी वाबळे यांच्या मजबूत पकडीच्या सहाय्याने संघाने हा मोठा विजय साकारला. उपनगरकडून आस्था सिंग आणि सेरेना म्हसकर यांचा खेळ तुलनेत फिका पडला.

सांगली संघाने पुणे ग्रामीण संघाला धूळ चारली
सांगलीने हाफ टाईमला २७-११ अशी भक्कम आघाडी घेत संयमी खेळ करत १८ गुणांनी विजय मिळवला. वीरप्पा बागर, दीपक राठोड आणि श्री पळसे यांच्या प्रभावी खेळाने पुणे ग्रामीणवर मोठा विजय मिळवला. पुणे ग्रामीणकडून अनुभव देवकाते आणि नईम पठाण यांनी प्रयत्न केले, मात्र विजयासाठी तो पुरेसा ठरला नाही.

धाराशिव संघाने वर्चस्व गाजवले
धाराशिव संघाने धुळे संघावर सहज मात केली. विश्वनाथ सुपेकर (धाराशिव) आणि कृष्णा चित्ते (धुळे) यांनी अप्रतिम खेळ केला.

ठाणे ग्रामीणने मुंबई शहर पूर्वला पराभूत करत बाद फेरीत प्रवेश केला. रोनित धुमाळ आणि आदित्य चिंचोलकर यांच्या प्रभावी खेळाने ठाण्याने मुंबईला हरवले. दर्शिल जाधव आणि प्रणव बर्गे यांनी प्रयत्न केले, पण संघाला पराभव टाळता आला नाही. 

रायगड संघाची रत्नागिरीवर मात
सार्थ सातमकर, विघ्नेश बामणे आणि मंथन पाटील यांच्या खेळाने रायगडने रत्नागिरी संघावर विजय मिळवला. ओम पाडावे आणि सुमित राठोड यांनी चांगला खेळ केला, पण तो अपुरा ठरला.

उपांत्य फेरीत स्थान मिळवणारे संघ

किशोरी गट : नाशिक शहर, सांगली, परभणी, पिंपरी चिंचवड

किशोर गट : सांगली, धाराशिव, ठाणे ग्रामीण, रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *