
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
नांदेड : तब्बल बारा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नांदेडमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांचा थाटात समारोप झाला. या स्पर्धेत कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकावत अजिंक्यपद मिळवले, तर यजमान छत्रपती संभाजीनगर संघाने उपविजेतेपद संपादन केले. पुणे विभाग तिसऱ्या स्थानावर राहिले.
समारोप समारंभात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी यापुढे दरवर्षी ही स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित केली जाईल आणि त्यासाठी राज्य शासन एक कोटी रुपयांची तरतूद करेल, अशी मोठी घोषणा केली. तसेच, महसूल विभागातील नियुक्ती आणि पदोन्नती प्रक्रियेत क्रीडापटूंना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
८३ क्रीडा प्रकार, दोन हजार खेळाडूंची रंगतदार स्पर्धा
गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धांमध्ये दोन हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध खेळांमध्ये भाग घेतला. क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, भालाफेक, थाळीफेक, धावणे, चालणे, संचलन आदी ८३ क्रीडा प्रकारांमध्ये रंगतदार सामने पार पडले.
स्पर्धेच्या सांस्कृतिक विभागातही जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. सांस्कृतिक स्पर्धेत नाशिक विभागाने प्रथम, कोकण विभागाने द्वितीय, तर नागपूर विभागाने तृतीय क्रमांक पटकावला.
कोकण विभाग अजिंक्यपदाचा मानकरी
या स्पर्धांमध्ये विविध प्रकारांत मिळालेल्या गुणांच्या आधारे कोकण विभागाने ३४१ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. छत्रपती संभाजीनगर २२७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर, तर पुणे विभाग २१७ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. संचलन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर प्रथम, नाशिक द्वितीय, तर कोकण विभाग तृतीय आला.
स्पर्धांसोबत नव्या सुविधांचे लोकार्पण
महसूल मंत्र्यांच्या हस्ते ‘व्हॉट्सअप ग्रीव्हियन्स ऍप’चे लोकार्पण करण्यात आले. या ९२७०१०१९४७ क्रमांकावर नागरिक तक्रारी, सूचना पाठवू शकतील. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.
महसूल विभागात क्रीडा संस्कृतीला चालना
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘क्रीडा’ ही केवळ स्पर्धा नसून प्रशासनातील एकतेचा संदेश देणारी बाब आहे. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त राहावे यासाठी या स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे सांगितले.
यावेळी उपस्थित खासदार डॉ अजित गोपछडे, आमदार बाबुराव कदम, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे, जिल्हाधिकारी आणि विविध अधिकारी वर्गाने महसूल मंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करत अभिनंदन केले.
दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार असल्याने महसूल विभागातील खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.