अफगाणिस्तान संघाचा इंग्लंडला पराभवाचा धक्का

  • By admin
  • February 26, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

इब्राहिम झद्रानची तुफानी १७७ धावांची खेळी, अजमतुल्लाहचे पाच बळी निर्णायक

लाहोर : इब्राहिम झद्रानची तुफानी १७७ धावांची खेळी आणि अजमतुल्लाह (५-५८) यांच्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर अफगाणिस्तान संघाने इंग्लंड संघाला रोमहर्षक सामन्यात ८ धावांनी पराभवाचा धक्का दिला. या विजयाने अफगाणिस्तान संघाचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले तर सलग दुसऱ्या पराभवासह इंग्लंड संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जो रुटची १२० धावांची खेळी व्यर्थ ठरली. या विजयासह अफगाणिस्तान संघाने रचला नवा इतिहास.

इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३२६ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना फिलिप सॉल्ट (१२) याला अजमतुल्लाह याने क्लीन बोल्ड करुन पहिला धक्का दिला. जेमी स्मिथ आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात ९ धावांवर बाद झाला. नबी याने त्याची विकेट घेतली. डावखुऱ्या बेन डकेट याने आक्रमक फलंदाजी केली. त्याला एक जीवदान देखील मिळाले. परंतु, तो त्याचा फायदा उठवू शकला नाही. डकेट ३८ धावांवर बाद झाला. त्याने चार चौकार मारले.

अनुभवी जो रुट आणि हॅरी ब्रूक या जोडीने एकेरी-दुहेरी धावा काढत धावफलक हलता ठेवला. कोणताही गोलंदाज त्यांच्यावर प्रभाव टाकू शकला नाही. नबी याने ही जोडी फोडली. ब्रूकला नबीने २५ धावांवर स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यावेळी इंग्लंड संघाची स्थिती २१.४ षटकात चार बाद १३३ अशी बिकट होती. परंतु, त्यानंतर जो रुट आणि कर्णधार जोस बटलर या जोडीने ८३ धावांची भागीदारी करत संघाला विजयपथावर आणले. अजमतुल्लाह याने बटलरला ३८ धावांवर बाद करुन मोठा अडसर दूर केला. लियाम लिव्हिंगस्टोन १० धावांवर तंबूत परतला.

४० षटकाअखेर इंग्लंडने सहा बाद २३६ धावा काढल्या होत्या. अनुभवी फलंदाज जो रुट हा एका बाजूने खंबीरपणे झुंज देत होता. जो रुट याने तब्बल ५ वर्षांनी एक दिवसीय सामन्यात शतक साजरे केले. ३७ डावानंतर रुटचे हे शतक आले आहे हे विशेष. जो रुट याने जेमी ओव्हरटन समवेत सातव्या विकेटसाठी अर्धशतकी (५४) भागीदारी करत संघाचा विजयी मार्ग सुकर बनवला. अजमतुल्लाह याने रुटची शतकी खेळी १२० धावांवर संपुष्टात आणत सामन्यात पुन्हा एकदा रोमांच आणला. रुट याने १११ चेंडूत एक षटकार व ११ चौकार मारले. २८७ धावसंख्येवर रुट बाद झाला. रुटला बाद केल्यानंतर अफगाणिस्तान संघाने विजय आपल्या हातात असल्यासारखा जल्लोष केला. परंतु, जेमी ओव्हरटन व जोफ्रा आर्चर या जोडीने संघाला विजयासमीप आणले. विजयासाठी १७ धावांची गरज असताना ओव्हरटन ३२ धावांचे योगदान देऊन बाद झाला. आर्चर (१४) षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि सामन्याचे पारडे अफगाणिस्तान संघाकडे झुकले. आदिल रशीदला ५ धावांवर बाद करुन अजमतुल्लाह याने संघाच्या रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब केले.

इंग्लंड संघ ४९.५ षटकात ३१७ धावांवर सर्वबाद झाला. अजमतुल्लाह उमरझाई याने ५८ धावांत पाच विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मोहम्मद नबी याने ५७ धावांत दोन गडी बाद केले. फारुकी (१-६२), रशीद खान (१-६६) व गुलबदिन नायब (१-१६) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

अफगाणिस्तान ७ बाद ३२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आठव्या सामन्यात या स्पर्धेत पहिल्यांदा खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाने ३२५ धावा करुन इंग्लंड संघासमोर मोठे आव्हान ठेवले आहे. अफगाण संघाचा सर्वात मोठा हिरो इब्राहिम झद्रान हा ठरला. त्याने १७७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनीही लहान डाव खेळून संघाला मोठ्या धाव संख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय अजिबात चांगला ठरला नाही कारण अफगाण संघाने ३७ धावांवर ३ विकेट गमावल्या. त्यानंतर, इब्राहिम झद्रानने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीसह १०४ धावांची भागीदारी केली आणि आपल्या संघाला सामन्यात परत आणले. शाहिदीने ४० धावा केल्या. त्यानंतर, झद्रानने अझमतुल्लाह उमरझाईसोबत ७२ धावांची जलद भागीदारी केली आणि शेवटी मोहम्मद नबीसोबत १११ धावांची जलद भागीदारी केली.

इब्राहिम झद्रानने इतिहास रचला
या सामन्यात इब्राहिम झद्रानने १७७ धावांची खेळी खेळून अनेक विक्रम रचले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात अफगाणिस्तानसाठी शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यासह, तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडूही बनला आहे. जादरानने १७७ धावांच्या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार मारले.

हे तेच मैदान आहे जिथे प्रथम खेळणाऱ्या इंग्लंडने ३५१ धावांचा ऐतिहासिक स्कोअर केला होता. प्रत्युत्तरादाखल, जोश इंग्लिशच्या १२० धावांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने सामना जिंकला. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड आणि अफगाणिस्तानने त्यांचे पहिले सामने गमावले आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत जिवंत राहण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *