
नॅट सायव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूजची धमाकेदार अर्धशतकी खेळी निर्णायक
बंगळुरू : नॅट सायव्हर-ब्रंट (नाबाद ७५) आणि हेली मॅथ्यूज (५९) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत यूपी वॉरियर्स संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला.
मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी १४३ धावांची गरज होती. यास्तिका भाटिया (०) लवकर बाद झाली. त्यानंतर हेली मॅथ्यूज व नॅट सायव्हर-ब्रंट या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी करुन सामना एकतर्फी बनवला. विजयासाठी चार धावांची गरज असताना हेली मॅथ्यूज ५९ धावांवर बाद झाली. मॅथ्यूज हिने ५० चेंडूत ५९ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. तिने दोन उत्तुंग षटकार व सात चौकार मारले. नॅट सायव्हर ब्रंट हिने अवघ्या ४४ चेंडूत नाबाद ७५ धावा फटकावत सामना एकतर्फी बनवला. तिने १३ खणखणीत चौकार मारले. कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाबाद ४ धावा फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबई इंडियन्स संघाने १७ षटकात दोन बाद १४३ धावा फटकावत मोठा विजय साकारला. सोफी एक्लेस्टोन (१-२९) व दीप्ती शर्मा (१-२५) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
यूपी वॉरियर्स नऊ बाद १४२
मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून यूपी वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यूपी वॉरियर्स संघाने २० षटकात नऊ बाद १४२ धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. यूपी संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. आक्रमक फलंदाज किरण नवगिरे (१) लवकर बाद झाली. त्यानंतर ग्रेस हॅरिस व वृंदा दिनेश या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. ग्रेस हॅरिस २६ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी करुन बाद झाली. तिने दोन षटकार व सहा चौकार मारले. वृंदा दिनेश हिने ३० चेंडूत ३३ धावा फटकावल्या. तिने पाच चौकार मारले. ही जोडी लागोपाठ बाद झाली. त्यामुळे यूपी संघ तीन बाद ८५ असा अडचणीत सापडला.
कर्णधार दीप्ती शर्मा (४), ताहलिया मॅकग्रा (१), चिनेल हेन्री (७), श्वेता सेहरावत (१९), सोफी एक्लेस्टोन (६), सायमा ठाकोर (०) या आक्रमक फलंदाजांना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने बाद केले. उमा छेत्री हिने नाबाद १३ धावांचे योगदान दिले.
मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्स संघाला २० षटकात नऊ बाद १४२ धावसंख्येवर रोखले. नॅट सायव्हर ब्रंट हिने १८ धावांत तीन विकेट घेत आपला प्रभाव दाखवला. शबनीम इस्माईल (२-३३), संस्कृती गुप्ता (२-११) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हेली मॅथ्यूज (१-३८), अमेलिया केर (१-२४) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.