
राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धा
नागपूर ः इंदूर येथे नुकत्याच झालेल्या ३१व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत ५९ प्लस वयोगटात रोहिणी आयलावार (नागपूर) व प्रदीप गुप्ता (पुणे) यांनी उपविजेतेपद पटकावले.
रोहिणी आयलावार (नागपूर) आणि प्रदीप गुप्ता (पुणे) यांनी पहिल्या फेरीत उत्तर प्रदेश जोडीचा ३-१ असा पराभव केला. त्यानंतर मध्य प्रदेशच्या नामांकित खेळाडू संध्या पटवा व जैन या जोडीवर ३-१ ने मात करुन आगेकूच केली. उपांत्यपूर्व सामन्यात गतवर्षीचा उपविजेता पश्चिम बंगालची करेबी मुखर्जी आणि पार्टनर यांना ३-० असे पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताचे प्रतिनिधित्व करणारे अग्रगण्य खेळाडू सुनील बाब्रस व त्यांची पत्नी पूर्वाश्रमीची सुजाता बापट यांच्यावर ३-० ने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. हा विजय न भूतो न भविष्यातील असा होता. अंतिम सामन्यात रोहिणी आयलावार आणि प्रदीप गुप्ता या जोडीने जागतिक स्तरावर कायम दबदबा निर्माण करणारी मोंटु मुरुम व अरोरा (पश्चिम बंगाल) या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्र जोडीचा ११-७,११-६,११-९ ने पराभव झाला. त्यामुळे रोहिणी आयलावार व प्रदीप गुप्ता यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे प्रदीप गुप्ता यांची ही पहिलीच स्पर्धा होती.