
जळगाव ः जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पीडबॉल स्पर्धेत नाशिक विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा स्पीडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय स्पीडबॉल स्पर्धा चाळीसगाव येथील तालुका क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली.
या राजस्तरीय शालेय स्पीडबॉल स्पर्धेत यजमान नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर या आठ विभागातील खेळाडू सहभागी झाले होते. १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली वयोगटात सुपर सोलो, सिंगल, डबल्स व सोलो रिले या क्रीडा प्रकारात स्पर्धा संपन्न झाली.
राज्यस्तरीय शालेय स्पीडबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, चाळीसगाव तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, महाराष्ट्र स्पीडबॉल संघटनेचे सचिव ज्ञानेश काळे, क्रीडा अधिकारी सचिन निकम, अध्यक्ष अजय देशमुख, प्रवीण शिंदे, जळगाव जिल्हा स्पीडबॉल असोसिएशनचे सचिव राहुल साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत यजमान नाशिक विभागाने सर्वसाधारण विजेतपद मिळविले.
या स्पर्धेत रामा रणदिवे (पुणे), अविनाश रोमन (सातारा), पवन खोडे, अभिजीत देशमुख (नाशिक), दशरथ जाधव (जळगाव), सेजल भोसले, प्रवीण शिंदे (छत्रपती संभाजीनगर), नितीन जाधव (अमरावती), आशिष देशपांडे (नागपूर), सुप्रिया (मुंबई), संतोष पाटील (नांदेड) यांनी तांत्रिक समिती व पंच म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अजय देशमुख, राहुल साळुंखे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला होता. या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयकर आयुक्त आणि महाराष्ट्र स्पीड बॉल संघटनेचे अध्यक्ष नितीन वाघमोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, कार्याध्यक्ष इंद्रजीत नितनवार, पुरुषोत्तम जगताप, अशोक सरोदे, प्रवीण काळे यांनी अभिनंदन केले.