
जुन्नर (जि. पुणे) ः जुन्नर येथील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ऋषिकेश संजय वालझाडे यांना पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट इतिहास आणि पुरातत्व शोध संस्थान यांच्यातर्फे ऋषिकेश वालझाडे यांना पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली. बालाघाट येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. या प्रसंगी १५ राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. या प्रसंगी बालाघाट जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मृणाल मीना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येथील क्रीडा शिक्षक ऋषिकेश संजय वालझाडे यांना आचार्य डॉ विरेंद्र सिंह गहरवार यांच्या हस्ते डाॅक्टरेट प्रदान करण्यात आली. या यशाबद्दल प्राचार्या प्रिया मेनन तसेच स्वामी विवेकानंद सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव तथा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विष्णू थोरवे, विश्वशांती दूत डॉ सुधीर तारे यांनी अभिनंदन केले.
ऋषिकेश वालझाडे यांनी कबड्डी, टेनिस बॉल क्रिकेट, गोल्फ, रोप स्किपिंग, रस्सीखेच, स्केटिंग अशा विविध खेळात विविध खेळाडू घडवले आहेत. राज्यस्तरीय कबड्डी पंच, राज्यस्तरीय सेपक टकरा पंच, राज्यस्तरीय रोप स्किपिंग पंच, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. विशेष २०२२-२३ चा गोवा सरकारचा विशेष आदर्श क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे इतिहास एवं पुरातत्व शोध संस्थानने त्यांना डाॅक्टरेट प्रदान केली आहे.