
परभणी ः हरियाणा येथे होत असलेल्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र नेटबॉल मुले व मुली दोन्ही संघांच्या कर्णधारपदी परभणी जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी लक्ष्मण गुहाडे आणि मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी मयुरी मस्के यांची निवड करण्यात आली.
भारतीय नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व हरियाणा नेटबॉल असोसिएशन, हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नेटबॉल १९ वर्षांखालील स्पर्धा भिवाणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशन यांच्या वतीने स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर व निवड चाचणी स्पर्धा श्याम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा मैदान भंडारा येथे घेण्यात आली. यातून महाराष्ट्र नेटबॉल संघांची अंतिम निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राष्ट्रीय नेटबॉल संघात परभणी जिल्ह्यातील दोन मुले व दोन मुली यांची निवड करण्यात आली व त्याच बरोबर महाराष्ट्राच्या दोन्ही संघांच्या कर्णधारपदी परभणी जिल्ह्यातील खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली. मुलांच्या संघाचा कर्णधार परभणी जिल्ह्यातील लक्ष्मण गुहाडे तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी परभणीची उत्कृष्ट खेळाडू मयुरी मस्केची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र नेटबॉल मुलांच्या संघात लक्ष्मण गुहाडे, वैष्णव शिंदे तर मुलींच्या संघांत मयुरी मस्के, सानिया गायकवाड यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशन अध्यक्ष विपीनभाई कामदार, महासचिव डॉ ललित जिवाणी, सहसचिव श्याम देशमुख, परभणी जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव कैलास माने, राष्ट्रीय प्रशिक्षक महेशकुमार काळदाते, माणिक कदम, मनीष जाधव, मानव माने, पांडुरंग हजारे, गणेश सौदागर, अनिल डवरे, ऋषिकेश काळे, अजय काळे, गणेश दराडे, पूजा श्रीखंडे, नम्रता अकुलवाड, साक्षी चव्हाण, रोहिणी उफाडे यांनी अभिनंदन केले.