
भारताचा ३६ खेळडूंचा संघ रवाना
छत्रपती संभाजीनगर ः जागतिक आईस स्टॉक स्पर्धेसाठी देशातून ३६ खेळाडूंचा संघ रवाना झाला आहे. यात महाराष्ट्राच्या ७ खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रिया येथील केफनबर्ग येथे जागतिक स्पर्धा पार पडणार आहे.
ऑस्ट्रिया येथील केफनबर्ग येथे जागतिक आईस स्टॉक स्पर्धा संपन्न होत आहे. जगातील ५२ देश यात सहभागी होणार असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशाचा संघ दिल्लीतून रवाना झाला. राज्यातून ज्युनियर आणि युथ गटात पाच खेळाडू तर सिनियर गटातून २ खेळाडू सहभाग घेत आहेत.
ज्युनिअर गटात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील खेळाडूंनी सहभाग होणार आहे. या गटात अर्शान मेहता, मेधावी फुटाणे, राजीव वासवानी, युथ गटात सौरीश साळुंखे, यश जाधव सरनाईक यांचा समावेश आहे. तर सीनियर गटात प्रवीणसिंह कोळी आणि साहिल गुर्जर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संघ सहभागी होण्यासाठी आईस स्टॉक संघटनेचे अध्यक्ष महेश राठोड आणि सचिव अजय सरवदे यांनी प्रयत्न केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
आईस स्टॉक हा खेळ युरोपियन देशांमधून खेळला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. बर्फाळ प्रदेशातील खेळ खेळताना सराव करण्यासाठी मोकळ्या गुळगुळीत जागेवर सराव केला जातो. नुकत्याच इराण येथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताचे खेळाडू सहभागी झाले होते. त्यात दोन सांघिक सुवर्णपदक तर दोन सांघिक रौप्य पदक भारताला मिळाले होते. हा खेळ खेलो इंडिया, नॅशनल पोलिस गेम, अखिल भारतीय विद्यापीठ मध्ये खेळला जातो तसेच पुढील होणाऱ्या युथ विंटर ऑलिम्पिक व हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत या खेळाचा समावेश झाला आहे.