
ठाणे ः पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे आयोजित राज्यस्तरीय ग्रामविकास परिषद व राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुरुषोत्तम पानबुडे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध जिल्ह्यातील व्यक्तींना प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पुरुषोत्तम सुखदेव पानबुडे रा. टवलार, ता. अचलपूर जिल्हा अमरावती यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरुषोत्तम पानबुडे हे अनेक वर्षापासून योग क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. सध्या ते आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर, जिल्हा ठाणे येथे योग शिक्षक व क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते राष्ट्रीय योगासन प्रशिक्षक आहेत. दरवर्षी आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल व आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल शहापूर येथील अनेक योगपटूंना प्रशिक्षण देऊन योगासन क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळून दिले. ठाणे जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन संघटनेचे ते सदस्य आहेत.
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूरचे कार्याध्यक्ष उमेश जाधव, सर्व पदाधिकारी, व्यवस्थापक सर्व विभागाचे प्राचार्य, सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी पुरुषोत्तम पानबुडे यांचे अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भास्कर पेरे पाटील, आमदार डॉ संजय कुटे, श्वेता परदेशी, डॉ संजय गायकवाड, पहाट फाउंडेशनचे संचालक अमोल भिलंगे, संचालिका अर्पिता सुरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.