राष्ट्रीय स्पर्धेत बीडच्या महेश घुले यांना रौप्य पदक

  • By admin
  • February 27, 2025
  • 0
  • 55 Views
Spread the love

बीड ः अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामगार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत बजरंग क्रीडा मंडळ व व्यायामशाळा वाघीराचे खेळाडू, आरटीओ ऑफिस पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेले राष्ट्रीय खेळाडू, पैलवान प्रा महेश घुले यांनी रौप्यपदक पटकावले.

या स्पर्धेत ७२ किलो ग्रिको रोमन व वन विभाग सातारा येथे कार्यरत असलेले विलास वाघमारे (राष्ट्रीय पदक विजेते) ५७ किलो फ्री स्टाईल यांनी प्रथम क्रमांक मिळवून संघात स्थान पक्के केले.

दरवर्षी केंद्र शासन व राज्य शासन मध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता राज्य ,राष्ट्रीय पातळीवर विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय नागरीसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन श्री शिवछत्रपती क्रीडापीठ महाळुंगे – बालेवाडी पुणे करण्यात आले होते. आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्यशासन यांच्या वतीने सचिवालय जिमखाना मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

या स्पर्धेत विविध राज्यांचे २२ संघ व ३५३ खेळाडू विविध वजन गटामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (पुणे), सतीश जोंधळे (सभापती सचिवालय जिमखाना मुंबई), दमय्यावार (अवर सचिव शालेय शिक्षण, क्रीडा व युवक सेवा मुंबई), स्पर्धा समन्वयक जोगिंदर सिंग (दिल्ली), स्पर्धा सचिव संजय कदम, स्पर्धा प्रमुख अरुण पाटील (क्रीडा अधिकारी), सचिवालय जिमखाना मानद सचिव संजय पोफळे (कुस्ती), तांत्रिक समिती प्रमुख संदीप वांजळे या मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

सचिवालय जिमखाना मानद सचिव संजय पोफळे यांनी महाराष्ट्र राज्य शासन कुस्ती संघाची निवड चाचणी लालबहादूर शास्त्री व्यायाम शाळा, मध्य रेल्वे माटुंगा मुंबई, या ठिकाणी आयोजित केली होती. या चाचणीद्वारे महाराष्ट्र राज्य शासनाचा कुस्ती संघ निवडण्यात आला. या संघामध्ये बजरंग क्रीडा मंडळ व व्यायामशाळा वाघीराचे खेळाडू, आरटीओ ऑफिस पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेले राष्ट्रीय खेळाडू, पैलवान महेश घुले ७२ किलो ग्रिको रोमन व वन विभाग सातारा येथे कार्यरत असलेले विलास वाघमारे (राष्ट्रीय पदक विजेते) ५७ किलो फ्री स्टाईल यांनी प्रथम क्रमांक मिळवून संघात स्थान पक्के केले. हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला होता.

पैलवान महेश घुले हे राष्ट्रीय खेळाडू बजरंग क्रीडा मंडळ व व्यायामशाळा वाघीराचे संस्थापक हरिभाऊ बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करतात. या राष्ट्रीय स्पर्धेत ७२ किलो वजनगटा महेश घुले यांनी प्रथम फेरीत आनंदू कृष्णन केरळ यांचा दोन विरुद्ध दहा अशा गुण फरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशच्या अजय सिंग यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, महेश घुले यांचा सामना आरएसबी मुंबई संघाच्या अमोल कोंढाळकर यांच्याबरोबर झाला. या सामन्यात आठ गुणांच्या फरकाने विजयी होऊन महेश घुले यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीचा सुवर्ण व रौप्य पदकाचा सामना हरियाणाच्या असलम खान यांच्याबरोबर झाला या सामन्यात सहा गुणांच्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यामुळे महेश घुले यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र ग्रीको रोमन संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले. तसेच महिला संघाने सुद्धा सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले या स्पर्धेचे बक्षीस वितरण दीपक शिवानंद पांडे (अप्पर पोलीस महासंचालक दळण वळण पुणे), रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, राष्ट्रीय स्पर्धा समन्वयक जोगिंदर सिंग व इतर मान्यवर यांच्या हस्ते पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *