
जळगाव : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने नियुक्त केलेल्या अॅडहॉक कमिटी मार्फत नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जळगावच्या दिशा पाटील हिने सुवर्णपदक प्राप्त केले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
या स्पर्धेत ६०-६५ किलो वजन गटात जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनची खेळाडू दिशा विजय पाटील हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्णपदक प्राप्त केले. या कामगिरीमुळे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात करण्यात आली.
दिशाला जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ सचिन वाणी, डॉ सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, राकेश एम पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, विशाल सोनावणे व शारदा पाटील यांनी दिशाचे अभिनंदन केले आहे.