
बांगलादेश संघाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द
रावळपिंडी ः चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा यजमान पाकिस्तान संघासाठी अतिशय खराब ठरली. दोन सलग पराभवानंतर पाकिस्तान संघ बांगलादेश संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विजय नोंदवून प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करणार होता. परंतु, पावसामुळे पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान संघाला रिकाम्या हाताने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील गट अ मधील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. रावळपिंडी शहरात पावसामुळे नाणेफेक होऊ शकली नाही. त्यामुळे, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील यजमान पाकिस्तानच्या प्रवासाचा वाईट शेवट झाला आहे. संघाला तीन पैकी दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. हा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. एक गुण घेऊन रिझवानचा संघ ग्रुप अ मध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. बांगलादेश संघाला त्यांच्यापेक्षा वरचढ होऊन तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गट अ मधून भारत आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
तीन सामन्यांत दोन पराभव आणि एक अनिर्णित राहिल्यानंतर बांगलादेशने एक गुण आणि -०.४४ च्या नेट रन रेटसह तिसरे स्थान पटकावले. दरम्यान, -१.०९ च्या नेट रन रेटसह पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला. पाकिस्तानला न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला, तर बांगलादेशलाही या दोन्ही संघांविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ग्रुप अ चा शेवटचा सामना २ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. या सामन्यात जिंकणारा संघ गट अ मध्ये अव्वल स्थानावर राहून साखळी फेरी पूर्ण करेल.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुपारी २.३० वाजता खेळवला जाणार होता. पण पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. पाऊस थांबला नाही तेव्हा सामना रद्द करण्यात आला. ही परिस्थिती पाकिस्तानसाठी खूपच लाजिरवाणी बनली. यावेळी त्याला स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडने पराभूत केले. त्यानंतर, त्याला भारताकडून पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तानचा शेवटचा गट सामना रद्द करण्यात आला आहे.