
पुणे जिल्हा सिलंबम स्पर्धेत ४०० खेळाडूंचा सहभाग
पुणे ः सातव्या पुणे जिल्हास्तरीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत १० व १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात डी ई एस इंग्लिश मीडियम स्कूल संघाने वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले.
पंडितराव आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल लॉ कॉलेज रोड पुणे येथे लाठी-काठी, तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा (सुरुल), मडु इत्यादी क्रीडा प्रकारामध्ये सातवी पुणे जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धा उत्साहात पार पाडली. या स्पर्धेत १० व १४ वर्षांखालील मुले व मुली डी ई एस इंग्लिश मीडियम स्कूल टिळक रोड संघाने प्रथम क्रमांक पटकावला. नवजीवन फाउंडेशन दिघी संघाने द्वितीय क्रमांक संपादन केला. वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरुड संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
१८ वर्षांखालील वयोगटात पंडितराव आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल लॉ कॉलेज रोड संघाने प्रथम क्रमांक पटकावला. लोहगाव सिलंबम संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. मृत्युंजय मर्दानी खेळ आखाडा चिखली संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी महाराष्ट्र विद्या मंडळच्या सेक्रेटरी शिवानी डोंगरे, उपजिल्हाधिकारी शुभम पवार, महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश कंठाळे, स्पर्धा आयोजन कमिटी अध्यक्ष संतोष चोरमले, पुणे जिल्हा सिलंबम असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी कुंडलिक कचाले उपस्थित होते.