
रणजी ट्रॉफी फायनल ः विदर्भ पहिल्या डावात सर्वबाद ३७९ धावा
नागपूर ः रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाचा पहिला डाव ३७९ धावसंख्येवर आटोपला. त्यानंतर केरळ संघाने दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद १३१ धावा काढल्या आहेत. सद्यस्थितीत विदर्भ संघाने सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.
विदर्भ संघाने दुसऱया दिवशी चार बाद २५४ धावांवर पुढे डाव सुरू केला. त्यानंतर विदर्भ संघाचा पहिला डाव १२३.१ षटकात ३७९ धावांवर संपुष्टात आला. दानिश मालेवार (१५३), करुण नायर (८६) यांच्या शानदार फलंदाजीनंतर यश ठाकूर (२५), कर्णधार अक्षय वाडकर (२३), नचिकेत भुते (३२) यांनी महत्वाचे योगदान दिले. खास करुन हर्ष दुबे (नाबाद १२) व नचिकेत भुते (३२) या शेवटच्या जोडीने ४४ धावांची भागीदारी करत संघाची स्थिती अधिक भक्कम केली.
केरळ संघाकडून निधीश (३-६१), ईडन अॅपल (३-१०२) यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. नेदुमंकुझी तुळस याने ६० धावांत दोन बळी घेतले.
केरळ संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ३९ षटकांच्या खेळात तीन बाद १३१ धावा काढल्या आहेत. केरळ संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. अक्षय चंद्रन (१४) व रोहन कुन्नम्मल (०) ही सलामी जोडी झटपट बाद झाली. दर्शन नळकांडे याने सलामी जोडीला बाद करुन केरळ संघाला दोन मोठे धक्के प्रारंभी दिले. त्यानंतर आदित्य सरवटे व अहमद इम्रान या जोडीने तिसऱया विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. यश ठाकूर याने इम्रानला ३७ धावांवर बाद करुन ही जोडी फोडली. त्याने ८३ चेंडूंचा सामना करत तीन चौकार मारले. आदित्य सरवटे याने १२० चेंडूंचा सामना करत नाबाद ६६ धावांची चिवट खेळी केली आहे. या अर्धशतकी खेळीत आदित्य याने १० चौकार मारले. कर्णधार सचिन बेबी ७ धावांवर खेळत आहे. सामन्याचा तिसरा दिवस हा केरळ संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विदर्भ संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांचे गोलंदाज उर्वरीत सात फलंदाज झटपट बाद करुन आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित.
विदर्भ संघाच्या दर्शन नळकांडे याने २२ धावांत दोन गडी बाद केले. यश ठाकूर याने ४५ धावांत एक बळी घेतला.