गतविजेत्या आरसीबी संघाचा सलग तिसरा पराभव

  • By admin
  • February 27, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

गुजरात जायंट्स संघाचा सहा विकेटने मोठा विजय; अॅशले गार्डनरचे अर्धशतक निर्णायक 

बंगळुरू : कर्णधार अॅशले गार्डनरच्या दमदार ५८ धावांच्या बळावर गुजरात जायंट्स संघाने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत गतविजेत्या आरसीबी संघावर सहा विकेट राखून मोठा विजय संपादन केला. घरच्या मैदानावर आरसीबी संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. 

गुजरात जायंट्स संघासमोर विजयासाठी १२६ धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातची बेथ मुनी (१७) व दयालन हेमलता (११) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. या जोडीने २५ धावांची भागीदारी केली. हरलीन देओल ५ धावांवर बाद झाली तेव्हा गुजरात संघाची स्थिती तीन बाद ६६ अशी बिकट होती. परंतु, त्यानंतर कर्णधार अॅशले गार्डनर हिने आक्रमक फटकेबाजी करत संघाला विजयपथावर आणले. ११७ धावसंख्येवर गार्डनर बाद झाली. तिने ३१ चेंडूत ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. गार्डनर हिने तीन उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. गार्डनर हिने फोबी लिचफिल्ड समवेत ५१ धावांची भागीदारी करुन आरसीबी संघाचा पराभव निश्चित केला. लिचफिल्ड हिने २१ चेंडूत नाबाद ३० धावा फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिने एक षटकार व तीन चौकार मारले. गुजरात संघाने १६.३ षटकात चार बाद १२६ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला. आरसीबी संघाकडून रेणुका सिंग ठाकूर (२-२४) व जॉर्जिया वेअरहॅम (२-२६) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 

आरसीबी संघाची फलंदाजी गडगडली
महिला प्रीमियर लीगच्या १२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरला. कर्णधार स्मृती मानधना २० चेंडूत १० धावा करून बाद झाली तर अष्टपैलू एलिस पेरी  धावांचे खाते देखील उघडू शकली नाही. या स्पर्धेच्या इतिहासात एलिस पेरी शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती. कनिका (३३) आणि राघवी आनंद सिंग बिश्त (२२) यांनी संघाला १२५ धावांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. 

गुजरात जायंट्सचा कर्णधार अ‍ॅश गार्डनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या डावाची सुरुवात स्मृती मानधना आणि डॅनिएल वायट करणार आहेत. डिआंड्रा डॉटिनने गुजरातला पहिली विकेट दिली, तिने डॅनियलला ४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसरी विकेट अॅलिस पेरीच्या रूपात पडली, तिला कर्णधार अॅश गार्डनर हिने शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्यानंतर स्मृती मानधना देखील दबावाखाली बाद झाली. मानधनाने २० चेंडूत फक्त १० धावा केल्या. २५ धावांत ३ विकेट गमावल्यानंतर आरसीबीवर खूप दबाव आला, जो कनिका आहुजा (३३) आणि आनंद बिश्त (२२) यांनी थोडा कमी केला. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली.

कनिका आहुजाने २८ चेंडूत ३३ धावा केल्या, ज्यामध्ये तिने २ षटकार आणि १ चौकार मारला. आनंद सिंग बिष्टने १९ चेंडूत २२ धावा केल्या. शेवटच्या षटकात, जॉर्जिया वेअरहॅमने २० धावा करून आरसीबीला १२५ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली.

या सामन्यात आरसीबीच्या डावात एकूण ६ चौकार लागले. २ चौकार मारणारा एकही फलंदाज नव्हता. गुजरात जायंट्सकडून डिआंड्रा डोटिन आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. कर्णधार अ‍ॅश गार्डनर आणि काश्वी गौतम यांना १-१ यश मिळाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *