
छत्रपती संभाजीनगर ः खोकडपूरा भागातील बंद पाडण्यात आलेली मनपा मराठी शाळा नव्याने बांधण्याचा निर्णय घेऊन जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठीचा गौरव करा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मनपा आयुक्तांकडे केली आहे.
खोकडपूरा भागातील मनपा प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे ही शाळा बंद पाडण्यात आली. ही शाळा मराठी माध्यमाची आहे. या शाळेच्या इमारतीत दारुड्यांचा अड्डा झाला आहे. जागतिक मराठी दिनानिमित्त मनपा मराठी शाळेची इमारत बांधण्याचा निर्णय घेतला जात नाही ही खेदाची बाब आहे, असे भाकपने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
खोकडपूरा भागातील कष्टकऱ्यांची मागणी आहे की, मनपा मराठी शाळेची इमारत पुन्हा नव्याने बांधण्याचे आदेश देऊन मराठी शाळेला वाचवावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली आहे. याचबरोबर शाळा बंद करून सदर जागा सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र देखील हाणून पाडावे व अशा योजना मंजूर करू नये अशीही मनपा आयुक्तांना विनंती करण्यात आली आहे.
बंद पाडण्यात आलेल्या मराठी मनपा खोकडपूरा शाळेच्या इमारती समोर भाकपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मराठी शाळा परत सुरू झालीच पाहिजे, शाळेच्या इमारतीत दारूचा अड्डा बंद करा, शाळा आमच्या हक्काची अशा घोषणा देण्यात आल्या.
निदर्शने झाल्यावर मनपा टाऊन कार्यालयात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाकपचे शहर सचिव ॲड अभय टाकसाळ, राजू हिवराळे, वंदना भालेराव, नंदाबाई वखरे, कडुबाई बनसोड, शालुबाई कांबळे, रंजना भालेराव, कविता होर्शिळ, लक्ष्मीबाई भालेराव, सुनीता होर्शिळ, शिलाबाई मुजमुले, चारुशीला जावळे, विद्या इंगळे, रेखा प्रधान, वंदना बोर्डे, संध्या साळवे, पूजा बोहथ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.