रणजी अंतिम सामन्यात विदर्भ संघाला ३७ धावांची आघाडी 

  • By admin
  • February 28, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

सचिन बेबीचे शतक हुकले, केरळ सर्वबाद ३४२ 

नागपूर ः कर्णधार सचिन बेबी याच्या दमदार ९८ धावांच्या खेळीनंतरही केरळ संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात ३४२ धावांवर सर्वबाद झाला. विदर्भ संघाने ३७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यात यश मिळवले. 

विदर्भ संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३७९ धावसंख्या उभारली. त्यानंतर केरळ संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. अक्षय चंद्रन (१४), रोहन कुन्नम्मल (०) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. आदित्य सरवटे याने १८५ चेंडूत ७९ धावांची खेळी करत डाव सावरला. अहमद इम्रान याने ३७ धावांचे योगदान देत आदित्यला सुरेख साथ दिली. 

कर्णधार सचिन बेबी याने सामन्याचा तिसरा दिवस गाजवला. सचिन बेबी याने २३५ चेंडूंचा सामना करत ९८ धावांची झुंजार खेळी केली. सचिनचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. सचिनने १० चौकार मारले. पार्थ रेखाडे याने सचिन बेबीची विकेट घेऊन मोठा अडसर दूर केला. त्यानंतर सलमान निजार (२१), मोहम्मद अझरुद्दीन (३४), जलज सक्सेना (२८) यांनी निकराची झुंज दिली. परंतु, हे फलंदाज बाद झाल्यानंतर केरळ संघ अडचणीत सापडला. ईडन अॅपल टॉम (१०), एम डी निधीश (१) यांना लवकर बाद करुन विदर्भ संघाने पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी घेतली. 

केरळ संघाचा पहिला डाव १२५ षटकात ३४२ धावांवर संपुष्टात आला. विदर्भ संघाच्या हर्ष दुबे (३-८८), पार्थ रेखाडे (३-६५), दर्शन नळकांडे (३-५२) यांनी प्रत्येकी तीन विकेट घेऊन संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यश ठाकूर याने ८३ धावांत एक बळी घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *