
पावसामुळे सामना अनिर्णित, अफगाणिस्तान संघाच्या आशा कायम
लाहोर : अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महत्त्वाचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. या परिस्थितीचा फायदा ऑस्ट्रेलिया संघाला झाला. ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
लाहोरमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला सामना पावसामुळे वाया गेला आणि सामना अनिर्णित राहिला. सामना पुन्हा नियोजित न झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला फायदा झाला आणि त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या अफगाणिस्तान संघाच्या आशा मावळल्या आहेत, पण त्यांचा प्रवास अद्याप अधिकृतपणे संपलेला नाही. अफगाणिस्तानचे लक्ष आता शनिवारी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर असेल. दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव अफगाणिस्तानसाठी दरवाजे उघडू शकतो. भारत आणि न्यूझीलंड संघानंतर आता ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला हरवले. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना पावसामुळे वाया गेला आणि आता अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पूर्ण होऊ शकला नाही. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने गट टप्प्यातील तीनपैकी एक सामना जिंकला आणि चार गुणांसह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
पावसामुळे सामना थांबला
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामना थांबवण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १२.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १०९ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड ४० चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ५९ धावा काढल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ १९ धावा फटकावल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने मॅथ्यू शॉर्टची विकेट गमावली, जो १५ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २० धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी आता आणखी १६५ धावा करायच्या होत्या. मात्र, पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नाही. हेड याला ६ धावांवर रशीद खान याने दिलेले जीवदान अफगाणिस्तान संघासाठी फारच महागात पडले.
अफगाणिस्तानचा डाव संपला
सेदिकुल्लाह अटल आणि अझमतुल्लाह उमरझाई यांच्या अर्धशतकांच्या मदतीने अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सेदिकुल्लाहने ९५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ८५ धावा आणि ओमरझाईने ६३ चेंडूत एक चौकार आणि पाच षटकारांसह ६७ धावा केल्या, ज्यामुळे अफगाणिस्तानला ५० षटकांत २७३ धावा करण्यात यश आले. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेदिकुल्लाह आणि उमरझाई यांनी शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले.
अफगाणिस्तानकडून, सेदिकुल्लाह आणि उमरझाई व्यतिरिक्त, इब्राहिम झद्रानने २२ धावा, रशीद खानने १९, रहमत शाहने १२, नूर अहमदने ६, गुलबदीन नायबने ४ आणि मोहम्मद नबीने १ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइसने तीन, तर स्पेन्सर जॉन्सन आणि अॅडम झांपा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय नाथन एलिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.