
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट ः अमित पाठक सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात साई श्रद्धा संघाने राउडी सुपर किंग्ज संघावर सात विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यात अमित पाठक याने सामनावीर किताब पटकावला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. साई श्रद्धा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. राउडी सुपर किंग्ज संघ २० षटकात आठ बाद ११० असे माफक लक्ष्य उभे करू शकला. त्यानंतर साई श्रद्धा संघाने १३.२ षटकात तीन बाद ११२ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात आकाश अभंग याने ३२ चेंडूत ४८ धावांची आक्रमक खेळी साकारली. आकाशने एक षटकार व नऊ चौकार मारले. विनोद लंबे याने ३३ चेंडूत ४२ धावा काढल्या. त्यात विनोदने पाच चौकार व एक षटकार मारला. अतुल वालेकर ये ३६ चेंडूत ३७ धावांची वेगवान खेळी केली. अतुलने चार चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत अमित पाठक याने ४ षटकात केवळ ११ धावा देत चार विकेट घेत सामना गाजवला. या प्रभावी कामगिरीमुळे अमित पाठक हा सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. संतोष साह याने १० धावांत तीन गडी बाद केले. सय्यद जलिस याने १६ धावांत दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः राउडी सुपर किंग्ज ः २० षटकात आठ बाद ११० (अतुल वालेकर ३७, मनीष करवा १५, इनायत अली ६, आशिष गवळी ११, धैर्यशील गायकवाड नाबाद १८, भूषण घोळवे ६, सनी १०, अमित पाठक ४-११, संतोष साह ३-१०, आकाश अभंग १-२०) पराभूत विरुद्ध साई श्रद्धा ः १३.२ षटकात तीन बाद ११२ (आकाश अभंग ४८, विनोद लंबे ४२, अमित पाठक २, फुझैल सिद्दीकी नाबाद ३, कपिल पल्लोड नाबाद ६, सय्यद जलिस २-१६, सनी १-६). सामनावीर ः अमित पाठक.