
करुण नायरचे दमदार नाबाद शतक, विदर्भ संघाची २८६ धावांची आघाडी
नागपूर ः मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज करुण नायर (नाबाद १३२) आणि दानिश मालेवार (७३) यांच्या १८२ धावांच्या भागीदारीच्या बळावर विदर्भ संघाने रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात केरळ संघाविरुद्ध २८६ धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याचा चौथा दिवस विदर्भ संघाच्या फलंदाजांनी गाजवत सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. विदर्भ संघाने रणजी ट्रॉफी जवळपास आपल्या ताब्यात घेतली आहे.
या सामन्यात पहिल्या दिवसापासून विदर्भ संघाने वर्चस्व राखले आहे. पहिल्या डावात ३७९ धावसंख्या उभारुन विदर्भ संघाने आपली स्थिती भक्कम केली. त्यानंतर केरळ संघाचा पहिला डाव ३४२ धावांवर रोखून पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना विदर्भ संघाने केरळ संघाचे आव्हान संपुष्टातच आणले.
विदर्भ संघाच्या गोलंदाजांनी केरळ संघाला ३४२ धावांवर रोखल्यानंतर विदर्भ संघाने एका हाताने रणजी ट्रॉफी आपल्या ताब्यात घेतली. चौथ्या दिवसअखेर विदर्भ संघाने चार बाद २४९ धावसंख्या उभारुन सामन्यात २८६ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे विदर्भ संघ आता रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या स्थितीत पोहोचला आहे.
केरळच्या गोलंदाजींनी पार्थ रेखाडे (१) व ध्रुव शोरे (५) या सलामी जोडीला झटपट गुंडाळून सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विदर्भ संघाची धावसंख्या फक्त ७ होती. मात्र, त्यानंतर दानिश मालेवार आणि अनुभवी करुण नायर या जोडीने तिसऱया विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी करत केरळची दावेदारी कमकुवत केली. मालेवार याने १६२ चेंडूत ७३ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार मारले.
अनुभवी करुण नायर याने पुन्हा एकदा दमदार शतक ठोकले. करुण नायरचे या हंगामातील हे नववे शतक आहे. त्याने २८० चेंडूंचा सामना करत नाबाद १३२ धावा काढल्या आहेत. शतकी खेळी करताना नायरने दोन षटकार व दहा चौकार मारले. रणजी ट्रॉफीपूर्वी करुण नायर याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पाच शतके ठोकली होती. रणजी फायनलमध्ये शतक ठोकून करुण नायर याने पुन्हा एकदा भारतीय संघात निवड करण्याची आपली दावेदारी भक्कम केली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भ संघाने चार बाद २४९ धावा काढल्या होत्या. त्यावेळी करुण नायर १३२ तर कर्णधार अक्षय वाडकर ४ धावांवर खेळत होते. यश राठोड २४ धावांवर बाद झाला. केरळ संघाकडून नधीश (१-३७), जलज सक्सेना (१-७६), आदित्य सरवटे (१-५५) व अक्षय चंद्रन (१-२९) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.