
लाईफलाइन-मासिया औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः सनी राजपूत सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मासिया औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात कॉस्मो फिल्म्स संघाने मासिया ब संघाचा ५६ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात सनी राजपूत हा सामनावीर ठरला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. मासिया ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॉस्मो फिल्म्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद १७१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मासिया ब संघ १३.३ षटकात नऊ बाद ११५ धावा काढू शकला. कॉस्मो फिल्म्स संघाने ५६ धावांनी विजय नोंदवत आगेकूच केली.

या सामन्यात अभिषेक चव्हाण याने ३३ चेंडूत ४७ धावांची आक्रमक खेळी साकारली. अभिषेकने दोन उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. इंद्रजित उढाण याने २५ चेंडूत ३५ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले. सतीश भुजंगे याने २४ चेंडूत ३३ धावांची आक्रमक खेळी केली. सतीशने सहा चौकार मारले. गोलंदाजीत सनी राजपूत याने २५ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. विराज चितळे याने २३ धावांत तीन गडी बाद केले. समर्थ जिवरग याने १९ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः कॉस्मो फिल्म्स ः २० षटकात आठ बाद १७१ (सनी राजपूत १८, सतीश भुजंगे ३३, विराज चितळे १९, अभिषेक चव्हाण ४७, रामेश्वर मतसागर १०, समर्थ जीवरग ११, रामाशिष नाबाद ८, गोविंद धवन नाबाद ५, इतर १९, प्रदीप जगदाळे २-२१, सुमित आगरे १-१८, राजेश शिंदे १-२३, इंद्रजित उढाण १-२२, योगेश चौधरी १-३०) विजयी विरुद्ध मासिया ब संघ ः १३.३ षटकात नऊ बाद ११५ (निकित चौधरी २४, इंद्रजित उढाण ३५, प्रदीप जगदाळे १२, योगेश चौधरी १५, इतर २३, सनी राजपूत ४-२५, विराज चितळे ३-२३, समर्थ जीवरग २-१९). सामनावीर ः सनी राजपूत.