
इंग्लंडचा सात विकेटने पराभव
कराची : रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (नाबाद ७२) आणि हेन्रिक क्लासेन (६४) यांच्या धमाकेदार अर्धशतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंड संघावर सात गडी (तीन बाद १८१) राखून विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली आहे. इंग्लंड संघ एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. इंग्लंडच्या पराभवासह अफगाणिस्तान संघाच्या आशा देखील संपुष्टात आल्या.
दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी अवघे १८० धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर स्ट्रिस्टन स्टब्स (०) लवकर बाद झाला. त्यानंतर रायन रिकेल्टन २६ धावांची आक्रमक खेळी करत तंबूत परतला. दोन बाद ४७ अशा स्थितीत रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि हेन्रिक क्लासेन ही आक्रमक जोडी जमली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी करत सामना एकतर्फी बनवला. क्लासेन षटकार ठोकून विजय साकारण्याच्या प्रयत्नात ६४ धावांवर बाद झाला. क्लासेनने ११ चौकार मारले. ड्यूसेन याने ८७ चेंडूत नाबाद ७२ धावा फटकावत संघाचा विजय सुकर बनवला. त्याने तीन उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. डेव्हिड मिलर याने २ चेंडूत सात धावा काढताना विजयी षटकार ठोकला. दक्षिण आफ्रिका संघाने २९.१ षटकात तीन बाद १८१ धावा फटकावत गटात अव्वल स्थान मिळवले. या विजयासह आफ्रिका संघ उपांत्य फेरीत दाखल झाला. कर्णधार म्हणून जोस बटलरचा हा शेवटचा सामना ठरला.
इंग्लंडचा सुफडा साफ
मार्को जॅन्सेन आणि विआन मुल्डर या वेगवान गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या मदतीने दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडला ३८.२ षटकांत १७९ धावांवर गुंडाळले. या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ही सर्वात कमी एकूण धावसंख्या आहे. इंग्लंड इतक्या कमी धावसंख्येवर सर्वबाद झाल्याने अफगाणिस्तानच्या आशा पूर्णपणे संपल्या आहेत.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची सुरुवात खराब झाली आणि जॅन्सनने इंग्लंडला तीन झटके दिले. इंग्लंडला मोठ्या भागीदारी करता आल्या नाहीत आणि ते त्यांच्यासाठी सर्वात मोठे नुकसान होते. जॅन्सेन आणि मुल्डर व्यतिरिक्त केशव महाराज यांनी दोन, तर लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
इंग्लंडकडून अनुभवी फलंदाज जो रूटने ४४ चेंडूत सर्वाधिक ३७ धावा केल्या, तर जोफ्रा आर्चरने २५, बेन डकेटने २४, कर्णधार जोफ्रा आर्चरने २१, हॅरी ब्रूकने १९, जेमी ओव्हरटनने ११, लियाम लिव्हिंगस्टोनने ९, फिल साल्टने ८ आणि आदिल रशीदने २ धावा केल्या. दरम्यान, साकिब महमूद पाच धावा काढून नाबाद राहिला.