
कल्याणच्या अजित कारभारी यांचा अनोखा उपक्रम
कल्याण (मुंबई) ः रशियातली हाडं गोठवणारी थंडी, एल-४१० विमानाचा अवघड प्रवास त्यात तब्बल १६ हजार ७३२ फुटांवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह घेतलेली उडी आणि नंतर बराच वेळ अधांतरी घडलेला थरार कल्याणच्या कोळिवली गावातील अजित कारभारी यांनी अनुभवला.
१९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त अजित कारभारी यांनी शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यासाठी रशियात जाऊन स्काय डायव्हिंग केले. यावेळी हवेत त्यांच्यासोबत शिवाजी महाराजांची प्रतिमा डौलाने हवेत फडकत होती. साहसी क्रीडा प्रकारांना महाराष्ट्रात प्रोत्साहन मिळावे यासाठीही हे स्काय डायव्हिंग केल्याचे कारभारी यांनी नमूद केले. शिवरायांच्या प्रतिमेसह स्काय डायव्हिंग करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
भारतासह महाराष्ट्रात स्काय डायव्हिंग किंवा पॅराशूटिंग या ऑलिम्पिक मान्यता प्राप्त साहसी क्रीडा प्रकाराला विशेष प्रोत्साहन दिले जात नाही. मात्र, तरीही या क्षेत्रात नवी उंची गाठण्याचा निश्चय कल्याण मधल्या ४३ वर्षीय अजित कारभारी यांनी केला आहे. एका खाजगी कंपनीत फायर सेफ्टी असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कारभारी यांनी २००७ मध्ये इंडियन एअरफोर्सचा बेसिक स्काय डायव्हिंग अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर, देशभरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्काय डायव्हिंग खेळांमध्ये ते सहभागी झाले. भारताबाहेर या क्रीडा प्रकाराला विशेष स्थान असल्याने कारभारी यांनी रशिया आणि थायलंडमध्ये जाऊन अनुक्रमे ए आणि बी असे या खेळांचे परवाने मिळवले.
शिवजयंतीचा मुहूर्त
या साहसी क्रीडा प्रकाराचे महाराष्ट्रात नाव व्हावे आणि इथल्या तरुणांनी या क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे हे अजित कारभारी यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. हे ध्येय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी शिवजयंतीला बरोबर १९ फेब्रुवारीच्या दिवशीच रशियात जाऊन स्काय डायव्हिंग करण्याचे निश्चित केले. कारण, त्यांच्यामते महाराष्ट्रात अफाट साहस हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवले आहे. शिवरायांच्या या साहसीवृत्तीची प्रेरणा इथल्या तरुणांनी घेत या खेळाकडे वळावे म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा हातात धरत स्काय डायव्हिंग केल्याचे स्पष्ट केले. यावेळी राज्यात या साहसी क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत अजित कारभारी यांनी व्यक्त केली.
उणे ३६ डिग्री सेल्सिअसमध्ये केले साहस
या स्काय डायव्हिंगच्या अनुभवाबद्दल स्पोर्ट्स प्लस सोबत बोलताना अजित कारभारी म्हणाले की, “रशियात मॉस्कोपासून २०० किलोमीटर अंतरावरच्या कोलम्ना भागात एरोग्रेड ड्रॉपझोन इथे मी स्काय डायव्हिंगसाठी गेलो होतो. तिथे १९ फेब्रुवारीला रशियन आर्मीचे स्काय डायव्हिंगचे मुख्य प्रशिक्षक कर्नल कोसत्या क्रीवोत्सशिव्ह यांच्यासह उणे ३६ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या थंड तापमानात हे स्काय डायव्हिंग केले. ही माझी ५७ वी उडी होती. यावेळी मी थंडीपासून बचावासाठी अंगात ६ वेगवेगळे कपडे घातले होते. महाराजांची प्रतिमा हातात घट्ट धरून ठेवायची हे मनातच ठरवलं होतं. महाराजांच्या साहसाचं स्मरण आणि महाराष्ट्रात साहसी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावं हा यामागचा माझा हेतू होता.”
शासनाचे प्रोत्साहन आवश्यक
भारतीय लष्करी क्षेत्राव्यतिरिक्त या क्रीडा प्रकार सध्या तरी नागरिकांना थेट स्पर्धक म्हणून सहभागी होता आलेले नाही. कारण, या खेळासाठीचा सराव करण्यासाठी भारतात दोनच केंद्र असून हा सराव खर्चिक आहे. याबद्दल अधिक बोलताना राज्य क्रीडा धोरण समितीचे सदस्य अविनाश ओंबासे म्हणाले की, “अजित कारभारी कायम साहसी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देतात. अशा साहसी क्रीडा प्रकारांच्या वाढीसाठी राज्य शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. शासनाने मदत उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्रातील साहसी तरुण या खेळाकडे वळतील आणि ऑलिम्पिक पातळीपर्यंत कामगिरी करू शकतील.