सर्व काही सरकार करेल ही चुकीची धारणा ः डॉ कृष्णगोपाल

  • By admin
  • March 2, 2025
  • 0
  • 84 Views
Spread the love

पुणे ः सर्व काही सरकार करेल ही पाश्चात्य आणि चुकीची धारणा आहे. सुरक्षा, न्याय अशा काही व्यवस्था आणि छोटी, मोठी कामे सरकार निश्चितपणे करेल. परंतु, समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे. हा विश्वास समाजात पुनर्स्थापित करूया. यासाठीच ‘जनकल्याण समिती’सारख्या संस्थांचे कार्य अधिक गतीने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यातूनच समाज प्रगती करेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपाल यांनी शनिवारी व्यक्त केला.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे आयोजित ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान समारंभात डॉ. कृष्णगोपाल बोलत होते. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी आर श्रीजेश यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाल, श्रीफल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

संघाचे कार्यकर्ता निर्माणाचे कार्य प्रारंभीची अनेक वर्षे समाजाच्या लक्षातच आले नाही. संघ युवकांची शक्ती वाया घालवत आहे, अशीही टीका त्या काळात झाली. परंतु नंतर समाजाविषयीची तळमळ आणि समाजाचे दुःख हे आपले दुःख मानून संघ स्वयंसेवकांनी हजारो सेवाकार्य सुरू केली. त्याचा लाखो जणांना लाभ झाला. असे डॉ कृष्णगोपाल यांनी सांगितले. समाजात जाऊन आवश्यक सेवाकार्य करण्याची ही संघाची कार्यशैली अद्भुत ठरली, असेही ते म्हणाले.

भक्तीभावाचे नाव आध्यात्म आहे आणि संवेदना, करुणा, हे आध्यात्माचे मूळ आहे. नुकताच प्रयागराज येथे झालेला महाकुंभ हेही आध्यात्म भावाचेच प्रगटीकरण आहे. करुणा, प्रेम, समर्पण हा भाव कुंभामध्ये दिसला. कुंभ हा ऐक्य भावाचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.

‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’तर्फे सेंद्रिय शेती आणि त्या विषयातील संशोधनाचे महत्त्वपूर्ण तसेच सफल कार्य सुरू आहे. त्याचे मॉडेल देशात ठीकठिकाणी दाखवण्याचे प्रयत्न झाले तर शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष ताराचंद गोयल यांनी व्यक्त केला.

हॉकीमध्ये मी जी कामगिरी करू शकलो त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करणारा खेळाडू तयार करणे आणि देशासाठी असा खेळाडू शोधणे हे माझे लक्ष्य आहे. हॉकीमध्ये ब्राँझ पदकाकडून सुवर्णपदकाकडे आपल्या देशाची कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मनोगत पी आर श्रीजेश यांनी व्यक्त केले.

जगात भारताला विश्वगुरू हा सन्मान निश्चितपणे प्राप्त होईल, असा विश्वास श्री स्वामी शंकराचार्य यांनी व्यक्त केला.

जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ अजित मराठे यांनी प्रास्ताविकामध्ये समितीच्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली. समितीचे सह कोषाध्यक्ष चंदन कटारिया यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ‘सेवा भारती’ संस्थेचे सचिव प्रदीप सबनीस यांनी आभार मानले. डॉ प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *