
७ ते ९ मार्च या कालावधीत आयोजन; पाच लाख ४० हजार रुपयांची पारितोषिके
नागपूर ः नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटना, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली रायसोनी फाऊंडेशन प्रस्तुत योनेक्स-सनराईज श्रीमती सदाबाई रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र राज्यस्तरीय महिला बॅडमिंटन स्पर्धा ७ ते ९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॅम्पस परिसरातील सुभेदार बॅडमिंटन हॉलमध्ये राज्यस्तरीय महिला बॅडमिंटन स्पर्धा तीन दिवस रंगणार आहे. ही स्पर्धा महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी व महिलांना सक्षम करण्याच्या हेतूने आयोजित केली जात आहे.
राज्यस्तरीय महिला बॅडमिंटन स्पर्धा अंडर ९, ११, १३, १५, १७ वर्षांखालील मुली एकेरी, अंडर १३, १५, १७ या गटात दुहेरी प्रकारात होईल. तसेच ओपन महिला गटातील सामने एकेरी व दुहेरी प्रकारात होणार आहेत. तसेच ज्येष्ठ महिला खेळाडूंचाही एक गट असेल. यात ३५ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील महिला खेळाडू सहभागी होऊ शकतील.
या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू कमीतकमी तीन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकेल. या स्पर्धेसाठी एकूण पाच लाख ४० हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही पारितोषिक रक्कम महाराष्ट्रातील राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे ही स्पर्धा महिला खेळाडूंसाठी अधिक रोमांचक ठरणार आहे अशी माहिती महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे मानद सचिव मंगेश काशिकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी आदित्य गलांडे (९५४५२०२८३३), कौस्तुभ धुपे (७९७२१२४०९४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.