
पुणे ः पुण्यातील इन्फिनिटी क्लबची जिम्नॅस्ट शताक्षी टक्के हिची ६ ते ९ मार्च दरम्यान बाकू, अझरबैजान येथे होणाऱ्या एफआयजी ॲपरेट्स जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
शताक्षी ही माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे १२ वी शिकत असून ती १७ वर्षाची आहे. बॅलन्स बीम आणि फ्लोअर एक्सरसाइज अपरेट्सवर स्पर्धा करेल. डेहराडून, उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांघिक रौप्य पदक व वैयक्तिक बॅलन्स बीम या साधन प्रकारात रौप्य पदक जिंकल्यानंतर तिची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिचे यश हे तिच्या कठोर परिश्रमाचे, समर्पणाचे आणि कर्वेनगर येथील इन्फिनिटी जिम्नास्टिक्स क्लबमध्ये तिला मिळणाऱ्या अपवादात्मक प्रशिक्षणाचे प्रमाण आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अजित जरांडे आणि मानसी शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शताक्षी प्रशिक्षण घेते. योगायोग असा की १९९३ मध्ये स्वतः अजित जरांडे यांनी बर्मिंगहॅम येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर सुमारे ३२ वर्षांनी त्यांचीच विद्यार्थिनी शताक्षी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. हे दोघेहि पुण्याचे खेळाडू आहेत हे सांगण्यास अभिमान वाटतो.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅस्ट तयार करण्यासाठी जरांडे यांचे समर्पण खरोखरच प्रेरणादायी आहे. शताक्षीसारख्या खेळाडूंना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी इन्फिनिटी जिम्नास्टिक्स क्लबमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतःचे घर गहाण ठेवले होते.