
जळगाव ः क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत खेलो इंडियाच्या फिट इंडिया उपक्रमाद्वारे दैनंदिन दिनचर्येत फिटनेसचा समावेश करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार लठ्ठपणाशी लढण्यासाठी व आपल्या तंदुरुस्ती व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग म्हणून शारीरिक हालचाली दैनंदिन करणे आवश्यक आहे. निरोगी राष्ट्राच्या उभारणी नियमित शारीरिक व्यायाम आणि खेळाचे महत्व नागरीकांमध्ये जागृत करण्याच्या उद्देशाने संडे ऑन सायकल ही मोहिम जळगाव येथे रविवारी राबवण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, खेलो इंडिया सेंटर, सायकलिंग क्लब, क्रीडा मंडळे व स्थानिक पातळीवरील शाळा मार्फत संडे ऑन सायकल या मोहिमेचे सुरळीत व सुरक्षित पद्धतीने रविवारी आयोजन करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथून सायकल रॅली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी विशाल बोडके आणि भरत देशमुख यांनी झेंडा दाखवून सुरू करण्यात आली.
या सायकल रॅली मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव अंतर्गत सुरू असलेले खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटरचे खेळाडू, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत प्रशिक्षण घेणारे खेळाडू उपस्थित होते. सर्व सायकल रॅलीमध्ये खेळाडूंनी फिटनेस का डोस आधा घंटा रोज अशा घोषणा देऊन नागरिकांमध्ये फिटनेस बाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सदर रॅली श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथून सुरू होऊन शहरातून मार्केट परिसर, सिव्हिल हॉस्पिटल, नंतर मेहेरूण तलाव परिसर येथून परत जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे समापन झाले.
सदर सायकल रॅली यशस्वी आयोजन करण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव येथील क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, बॉक्सिंग क्रीडा मार्गदर्शक नीलेश बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले.