
छत्रपती संभाजीनगर ः जी एच रायसोनी मेमोरियल छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन आणि कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या स्पर्धेला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि फिडेची मान्यता आहे. या स्पर्धेचे उद्घाटन हिमालया पब्लिक स्कूल, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. या स्पर्धेत दोन लाख रुपयांची पारितोषिके रायसोनी फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून हिमालया पब्लिक स्कूलच्या प्राचार्या गजाला शेख यांची उपस्थिती होती. त्यांनी बुद्धिबळ पटावर चाल खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंद्र पटेल, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशनचे सचिव भूषण श्रीवास, मुख्य पंच अजिंक्य पिंगळे, अमरीश जोशी आणि स्पर्धा निरीक्षक एस एस सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत राज्यभरातून ३२४ खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय रेटिंग स्पर्धेचा दर्जा प्राप्त आहे. विशेषतः, जे खेळाडू अद्याप रेटेड नाहीत, त्यांना या स्पर्धेतून फिडे रेटिंग मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेत रोख पारितोषिके व तसेच विविध वयोगटातील विजेते खेळाडू व महिला गटांमध्ये आकर्षक चषक ठेवण्यात आली आहे.या स्पर्धेतील स्थानिक खेळाडूंना पण विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.