
इशा पठारे कर्णधार
पुणे ः चंदीगड येथे होणाऱया आगामी बीसीसीआय महिला अंडर २३ वन-डे ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्राचा महिला संघ घोषित केला आहे. ईशा पठारे हिची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मानद सचिव कमलेश पिसाळ यांनी अंडर २३ महिला क्रिकेट संघ जाहीर केला. महाराष्ट्र संघात ईशा पठारे (कर्णधार), खुशी मुल्ला (उपकर्णधार), ईश्वरी सावकार, ईश्वरी अवसरे, श्रद्धा गिरमे, भाविका अहिरे, आयशा शेख, श्रावणी देसाई, ज्ञानेश्वरी पाटील, श्रुती महाबळेश्वरकर, इशिता खळे, गायत्री सुरवसे, सौम्यलता बिराजदार, उत्कर्ष कदम, श्वेता सावंत या खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेला चंदीगड येथे पाच मार्च रोजी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सलामीचा सामना पाँडिचेरी महिला संघाशी पाच मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र महिला संघ नागालँड (७ मार्च), दिल्ली (९ मार्च), पश्चिम बंगाल (११ मार्च), गुजरात (१३ मार्च) या संघांविरुद्ध खेळणार आहे. बाद फेरीचे सामने १७ ते २१ मार्च या कालावधीत होतील. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने २४ मार्च रोजी होणार आहेत. अंतिम सामना २६ मार्च रोजी होणार आहे, असे सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले.