
मुंबई : मुंबईचे माजी प्रख्यात क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे ३ मार्च रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. डावखुरा फिरकीपटू म्हणून ते तब्बल २० वर्षे मुंबई संघासाठी खेळले. दुर्देवाने त्यांना भारतीय संघात कधीही स्थान मिळू शकले नाही. त्यावेळी बिशन सिंग बेदी हे भारतीय संघाचे गोलंदाजीचे आधारस्तंभ होते.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहिली. गावसकर म्हणाले की, ‘अल्पावधीत मुंबई क्रिकेट क्षेत्राने मिलिंद व पद्माकर हे दोन दिग्गज खेळाडू गमावले आहेत. ते मुंबई संघाच्या अनेक विजयांचे शिल्पकार राहिले होते.’
१९६१-६२ च्या हंगामात २१ वर्षांच्या वयात प्रथम श्रेणी कारकिर्दीला सुरुवात करणारे शिवलकर १९८७-८८ च्या हंगामात ४७ वर्षांचे होईपर्यंत मुंबई संघाकडून सामने खेळले. त्यांनी १२४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५८९ विकेट्स घेतल्या. त्यामध्ये ४२ वेळा पाच विकेट्स आणि १३ वेळा १० विकेट्सचा समावेश आहे. १९७२-७३ च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने तामिळनाडूविरुद्ध १६ धावांत ८ आणि १८ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि मुंबईला सलग १५ वे जेतेपद मिळवून दिले.
मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
देशांतर्गत क्रिकेट अनेक वर्षे गाजवणाऱ्या पद्माकर शिवलकर यांना २०१६ मध्ये सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले होते.