
सोलापूर ः राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यलोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य पदक अशी सात पदके मिळाली आहेत.
चंद्रपूर येथे गोडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने महोत्सवाचे आयोजन केले होते. राज्यातील २३ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला. सोलापूर विद्यापीठाच्या २० संघातून १५२ खेळाडूंनी सहभाग घेतला. १८ जणांनी मार्गदर्शन केले. हर्ष राऊत याने २०० मीटर मध्ये सुवर्णपदक तर १०० मीटर धावणे रौप्य पदक मिळवले. भालाफेक या प्रकारात नीरज महानवर याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सुचिता बाबर हिने उंच उडी या प्रकारात रौप्य तर तिहेरी उडी मध्ये प्रणिती जाधवर हिने रौप्य पदक मिळवले.
पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत बबलू चव्हाण याने कांस्य पदक जिंकले. अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळांमध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कबड्डी महिला व बुद्धिबळ महिला संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो या संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याची माहिती क्रीडा महोत्सवाचे समन्वयक प्रा बाळासाहेब वाघचवरे यांनी माहिती दिली.
खेळाडूंचा व क्रीडा संचालक प्रशिक्षक क्रीडा संचालक डॉ अशोक पाटील व डॉ किरण चोकाककर यांचा सत्कार कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ योगिनी घारे, क्रीडा संचालक डॉ अतुल लाकडे उपस्थित होते.