
लाईफलाइन-मस्सिया औद्योगिक क्रिकेट ः सुमित लोंढे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मस्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत एमजीएम संघाने चुरशीच्या सामन्यात जीएमसीएच टीमचा एक गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला. या सामन्यात सुमित लोंढे याने नाबाद ५० धावांची दमदार खेळी करत एकहाती विजय मिळवून देत सामनावीर किताब पटकावला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. एमजीएम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमजीएम गोलंदाजांनी जीएमसीएच टीमला १७.५ षटकात अवघ्या १०९ धावांवर रोखून कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. एमजीएम संघासमोर विजयासाठी ११० धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमजीएम संघाला मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, एमजीएम संघाने १९.१ षटकात नऊ बाद ११३ धावा फटकावत एक विकेट राखून रोमांचक विजय साकारला.
या सामन्यात एमजीएम संघाच्या विजयाचा हिरो ठरला सुमित लोंढे. सुमितने ४४ चेंडूत नाबाद ५० धावांची शानदार अर्धशतकी खेळी करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याने एक षटकार व पाच चौकार मारले. सुमितने विजयी चौकार ठोकत स्वतःचे अर्धशतक साजरे केले. रितेश जाधव याने २० चेंडूत ३० धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार मारले. दादासाहेब याने एक षटकार व तीन चौकारांसह २६ धावा काढल्या. गोलंदाजीत डॉ मयूर राजपूत याने २० धावांत तीन विकेट घेतल्या. शिव वर्दे याने २२ धावांत तीन गडी बाद केले. लक्ष्मण सूर्यवंशी याने २ धावांत दोन गडी टिपले.
संक्षिप्त धावफलक – जीएमसीएच टीम – १७.५ षटकात सर्वबाद १०९ (दादासाहेब २६, स्वप्नील जेजूरकर १७, रितेश जाधव ३०, गणेश गावडे २०, डॉ मयूर राजपूत ३-२०, लक्ष्मण सूर्यवंशी २-२, अमित पाठक २-१७, रहीम खान १-१३, सुमित लोंढे १-२२, अमर असोलकर १-२०) पराभूत विरुद्ध एमजीएम टीम ः १९.१ षटकात नऊ बाद ११३ (गिरीश गाडेकर २५, सुमित लोंढे नाबाद ५०, अक्षय बनकर १२, लक्ष्मण सूर्यवंशी ७, डॉ आर्यन केंद्रे ९, अब्दुल शेख नाबाद ०, शिव वर्दे ३-२२, अर्जुन पटेल २-२७, अमोल दौड १-२१, रितेश जाधव १-१९). सामनावीर ः सुमित लोंढे.