
लाईफलाइन-मस्सिया औद्योगिक क्रिकेट : सचिन शेडगेची तुफानी १५१ धावा, नऊ षटकार, २० चौकारांचा पाऊस
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाइन मस्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत एनआरबी संघाने सीमेन्स एनर्जीझर्स संघावर तब्बल १८१ धावांनी विजय नोंदवला. या स्पर्धेतील हा धावांचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. सचिन शेडगे याने नाबाद १५१ धावांची तुफानी शतकी खेळी करत सामनावीर किताब पटकावला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. सीमेन्स एनर्जीझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीमेन्स संघाला हा निर्णय महागात पडला. एनआरबी संघाने धमाकेदार फलंदाजी करत २० षटकात दोन बाद २५८ असा धावांचा डोंगर उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. २५९ धावसंख्येचा पाठलाग करताना सीमेन्स संघ १४.३ षटकात अवघ्या ७७ धावांत सर्वबाद झाला. एनआरबी संघाने तब्बल १८१ धावांनी सामना जिंकून आगेकूच केली.
या सामन्यात एनआरबी संघाच्या सचिन शेडगे याने वादळी फलंदाजी केली. सचिनने अवघ्या ६९ चेंडूंचा सामना करत १५१ धावांची धमाकेदार शतकी खेळी साकारली. सचिनने या वादळी शतकी खेळीत तब्बल नऊ षटकार व २० चौकार ठोकले. सचिनच्या तुफानी फटकेबाजीने मैदान दणाणून गेले होते. शुभम हरकळ याने १७ चेंडूत ४३ धावांची वेगवान खेळी केली. शुभमने चार षटकार व तीन चौकार मारले. विनोद लंबे याने दोन षटकार व चार चौकारांसह ३९ धावांची आक्रमक खेळी केली. गोलंदाजीत व्यंकटेश सोनवलकर याने १५ धावांत चार विकेट घेत चमकदार कामगिरी बजावली. स्वप्नील मोरे याने दोन गडी बाद केले. शशिकांत पवार याने ७ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : एनआरबी संघ : २० षटकात दोन बाद २५८ (सचिन शेडगे नाबाद १५१, विनोद लंबे ३९, शुभम हरकळ नाबाद ४३, इतर २२, अभिजीत मोरे १-३६, समीर धवलशंख १-६०) विजयी विरुद्ध सीमेन्स एनर्जीझर्स संघ : १४.३ षटकात सर्वबाद ७७ (हिमांशू गिरी १६, अजय गव्हाणे १९, समीर धवलशंख ९, अभिजीत मोरे १२, व्यंकटेश सोनवलकर ४-१५, शशिकांत पवार २-७, स्वप्नील मोरे २-०, संदीप राठोड १-१६). सामनावीर : सचिन शेडगे.