
छत्रपती संभाजीनगर : श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थान नांदेड येथे आयोजित ‘झेनिथ’ आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) छत्रपती संभाजीनगर संघाने चमकदार खेळ करत उपविजेतेपद मिळवले.
उपांत्यपूर्व फेरीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संघाचा प्रभावी पराभव केला तर उपांत्य फेरीत एमजीएम नांदेड संघावर रोमांचक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात संघर्षपूर्ण खेळ करत उपविजेतेपद पटकाविण्यात एमआयटी संघाने यश मिळविले.
स्पर्धेत संपूर्ण वेळ उज्वल कामगिरी करणाऱ्या नरसिंहा राजपूत याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरविण्यात आले. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे एमआयटीच्या संघाला उपविजेतेपद मिळवण्यात मोलाची मदत झाली.
संघाच्या उल्लेखनीय यशाबद्दल एमआयटी ग्रुपचे महासंचालक मुनीश शर्मा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ निलेश पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ अमित रावते, सहनिबंधक प्रा मकरंद वैष्णव आणि विलास त्रिभुवन यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या संघाने एमआयटीचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने शिस्तबद्ध आणि कौशल्यपूर्ण खेळ करत उत्कृष्ट यश मिळवले. फुटबॉल संघाच्या विजयी प्रवासात साहिल पाटील, हिमांशू थोरात, नरसिंहा राजपूत, परिमल हिवराळे, ओम मेणे, शंतनु खोडके, सोहेल बेग, प्रतीक भोसले, करण तांबे, मयूर असोले, हर्षल महिंदळकर, अमित नानावरे, योगेश राठोड, इबाद शेख आणि झहीद पठाण या खेळाडूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
एमआयटी छत्रपती संभाजीनगरच्या संघाने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या नावाचा नवा ठसा उमटवला आहे. या यशामुळे सर्व स्तरांतून खेळाडूंचे कौतुक होत आहे.